दरवर्षी दिवाळीच्या आसपास दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते. यावेळी अनेक भागांत प्रदुषणाची पातळी ९०० च्या पुढे गेली आहे. ज्याचा तुमच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे. तुमच्या फुफ्फुसाबरोबर डोळे, त्वचा आणि श्वसन मार्गावर याचे घातक परिणाम होत आहेत. ही परिस्थिती टाळण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे वातावरण शक्य तितके शुद्ध ठेवणे. यात सध्या अनेक जण शुद्ध हवेचा श्वास घेण्यासाठी घरात एअर प्युरिफायरचा वापर करतात. पण, अनेकांना एअर प्युरिफायर खरेदी करणे परवडणारे नसते किंवा घराची रचना ते वापरण्यायोग्य नसते. अशावेळी छोट्या इनडोअर प्लांटमधून तुम्हाला घरातील हवा शुद्ध ठेवता येऊ शकते. नासाच्या शास्त्रज्ञांना संशोधनात काही वनस्पती हवेतील विषारी पदार्थ काढून टाकण्यास सक्षम असल्याचे आढळले आहे, ज्या तुमच्या घरात एअर प्युरिफायरचे काम करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एअर प्युरिफायरपेक्षा कमी नाहीत ‘हे’ पाच इनडोअर प्लांट

१) एरिका पाम

एरिका पाम हवेतील एसीटोन, जाइलीन आणि टोल्युइन फिल्टरसारख्या जटिल रसायनांना फिल्टर करण्याचे काम करतात. या वनस्पतीची लागवड करणे खूप सोपे आहे, कारण त्याला दररोज पाणी घालण्याची गरज नसते. पण, हे झाड थेट सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी ठेवू नये.

२) रबर प्लांट

ही वनस्पती कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेण्यास आणि श्वास घेण्यायोग्य ऑक्सिजनमध्ये रूपांतरित करण्यात प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. यामुळे घरामध्ये या वनस्पतीची लागवड करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण, ही वनस्पतीदेखील नेहमी अशा ठिकाणी ठेवावी, जेथे सूर्यप्रकाश कमी येतो. कारण दुपारच्या उन्हामुळे ते जळू शकते. तसेच भांड्यातील माती पूर्णपणे कोरडी झाल्यावरच त्यात पाणी घालावे.

३) स्नेक प्लांट

स्नेक प्लांट ही वनस्पती कार्बन मोनॉक्साईड, बेंझिन, फॉर्मल्डिहाइड आणि घरातील हवेत आढळणारी इतर घातक रसायने शोषून घेण्यास प्रभावी आहे. एवढेच नाही तर ही वनस्पती ऑक्सिजनदेखील तयार करते. घरामध्ये ज्या ठिकाणी जास्त प्रकाश येतो त्या ठिकाणी ही वनस्पती ठेवा. या वनस्पतीलाही दररोज पाण्याची गरज नसते. तुम्ही दोन ते तीन दिवसातून एकदाच पाणी द्यावे.

४) पीस लिली

पीस लिली ६० टक्के हवा शुद्ध करण्यात प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. ही वनस्पती घरात ठेवायची असल्यास खूप कमी प्रकाश असेल अशी जागा निवडा. तसेच आठवड्यातून एकदाच त्यात पाणी घालावे.

५) स्पायडर प्लांट

स्पायडर प्लांट दोन दिवसात घरातील हवा ९० टक्के स्वच्छ करू शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला स्वच्छ हवेत राहायचे असेल तर तुम्ही ही वनस्पती घरात लावू शकता. लांब पानांमुळे हे झाडं छताला लटकवता येऊ शकेल अशा कुंडीत लावणे अधिक सोयीचे आहे. तसेच, सामान्य तापमान असलेल्या ठिकाणी ठेवा आणि सहा-सात दिवसांतून एकदा माती ओली होईपर्यंत पाणी द्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nasa suggest poor air quality can be improved by these 5 indoor air purifier plants sjr