शरीराला योग्य ते पोषण मिळावं आणि तंदुरुस्त राहावं अशी आपली सर्वांचीच इच्छा असते. त्यासाठी आपण आपल्यापरीने प्रयत्न देखील करत असतो. पण आपली जीवनशैलीच अशी आहे कि त्यात अनेकदा आपलं आपल्या आरोग्याकडे आणि आहाराकडे सर्वाधिक दुर्लक्ष होतं. चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पदार्थांच्या सेवनाने बिघडलेली जीवनशैली पुन्हा रुळावर आणणं हे आपल्यासाठी एक मोठं आव्हानच आहे. याच पार्श्वभूमीवर, आपल्या शरीराला असणाऱ्या पोषणाच्या गरजेविषयी लोकांना माहिती देण्यासाठी विविध जागरूकता उपक्रम आयोजित केले जात असतात. राष्ट्रीय पोषण सप्ताह हा त्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो.
इतिहास
अमेरिकन डायटेटिक असोसिएशनच्या सदस्यांनी आहारशास्त्राच्या व्यवसायाला प्रोत्साहन देताना पोषण शिक्षणाचा संदेश देण्यासाठी मार्च १९७३ मध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू केला. १९८० च्या दशकात राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या पुढाकाराला खूप पाठिंबा मिळाला आणि हा आठवडाभर चालणारा महोत्सव पुढे महिनाभर साजरा केला जाऊ लागला. त्यानंतर, भारत सरकारने देखील १९८२ मध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह स्मरणोत्सवाची सुरुवात केली. पोषणाविषयी जागरूकता निर्माण कारण्यासाठी आणि प्रत्येकाला त्याचं महत्त्व समजून देण्यासाठी त्याचप्रमाणे एक निरोगी, शाश्वत जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
महत्त्व
पोषण हे पदार्थांचं सेवन करण्याचं एक शास्त्र आहे. पोषक अन्न आपल्या शरीराला ऊर्जा, प्रथिनं, आवश्यक चरबी, जीवनसत्त्वं आणि खनिजं पुरवत, जगण्यासाठी, शरीराच्या वाढीसाठी आणि योग्यरित्या कार्य करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. कारण, चुकीच्या आहारामुळे आपण नेहमीच अनेक व्याधी आजारांना निमंत्रण देत असतो. म्हणूनच चांगल्या आरोग्यासाठी दररोज संतुलित आहार घेणं आवश्यक आहे.
राष्ट्रीय पोषण सप्ताह २०२१ थीम
राष्ट्रीय पोषण सप्ताहाचा उत्सव दरवर्षी एका थीमवर आधारित असतो. यंदा म्हणजेच राष्ट्रीय पोषण सप्ताह २०२१ ची थीम ‘सुरुवातीपासूनच स्मार्ट आहार घेणं’ ही आहे. जी स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रकारच्या अन्नपदार्थांचं सेवन करण्यावर भर देते.