उच्च रक्तदाबाची समस्या आजकाल खूप सामान्य झाली आहे. उच्च रक्तदाबाचे कारण म्हणजे खराब जीवनशैली, तणाव या चुकीच्या सवयींमुळे विकसित होतो. उच्च रक्तदाब ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत वाढतो, ज्यामुळे कालांतराने हृदयाला हानी पोहोचते. यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. मात्र, योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीने हा आजार नियंत्रणात ठेवता येतो.
जेव्हा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचा बीपी वाढतो, तेव्हा रुग्णाला तीव्र डोकेदुखी, छातीत दुखणे, धाप लागणे, गोंधळ आणि त्वचेवर लाल पुरळ यांसारखी लक्षणे दिसू लागतात. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे आवश्यक आहे, तसेच आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
रक्तदाब नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. औषधाव्यतिरिक्त त्यावर नियंत्रण ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत. नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करून तुम्ही रक्तदाब नियंत्रित करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात ५ असे सोपे मार्ग जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी अतिशय प्रभावी आहेत.
मिठाचे सेवन कमी करा
अन्नासोबत जास्त मीठ खाल्ल्याने तुमच्या शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते. ज्यामुळे उच्च रक्तदाब, स्ट्रोकसह इतर गंभीर हृदयरोग होऊ शकतात. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही जेवणात मिठाचे सेवन कमी करा. याशिवाय प्रक्रिया केलेल्या अन्नाऐवजी ताजी फळे आपल्या आहारात घ्यावीत. तसेच सोडियमचे सेवन कमी केल्याने उच्च रक्तदाब ५ ते ६ मिमी HG कमी होऊ शकतो. दरम्यान सामान्य व्यक्तींनी एका दिवसात २,३०० मिलीग्रामपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.
पोटॅशियमचे सेवन वाढवा
उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांसाठी पोटॅशियम हे एक आवश्यक पोषक तत्व आहे. हे खनिज अतिरिक्त सोडियमपासून मुक्त होण्यास मदत करते आणि रक्तवाहिन्यांवरील दबाव कमी करते. हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, बटाटे, आणि रताळे, खरबूज, केळी, संत्री आणि जर्दाळू, दूध, दही, यांसारखे पोटॅशियम समृद्ध असलेले पदार्थ खा.
नियमित व्यायाम करा
नियमित व्यायाम करा. अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की प्रत्येक व्यक्तीने निरोगी राहण्यासाठी आणि जुनाट आजारांचा धोका कमी करण्यासाठी ३० ते ४५ मिनिटे नियमित व्यायाम केला पाहिजे. उच्च रक्तदाबाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या सर्व लोकांसाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. नियमित व्यायामामुळे तुमचे हृदय मजबूत होते. तसेच रक्तवाहिन्यांवरील दबाव कमी करू शकते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी चांगल्या आरोग्यासाठी दिवसातून ४० मिनिटे चालणे पुरेसे आहे.
सिगारेट आणि अल्कोहोल सेवन करू नये
उच्च रक्तदाब असलेल्या काही रुग्णांना सिगारेट आणि अल्कोहोल सेवन करण्याची सवय असते. तर अशा रुग्णांनी सिगारेट आणि अल्कोहोल सेवन पुर्णपणे बंद करा. कारण हे दोन्ही उच्च रक्तदाब वाढवण्यास मदत करतात. अनेक संशोधने असे सुचवतात की अल्कोहोलमुळे उच्च रक्तदाब अधिक प्रमाणात वाढतो. अल्कोहोल आणि सिगारेट दोन्ही रक्तदाब वाढवू शकतात आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान करू शकतात.
रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करा
ब्रेड आणि साखर यांसारखे पदार्थांच्या सेवनाने तुमच्या रक्तातील साखरेमध्ये झपाट्याने बदल होतात आणि त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थांऐवजी संपूर्ण धान्य असलेले पदार्थांचे सेवन करा. तसेच साखरेऐवजी गूळ किंवा मध वापर करा.
रक्तदाब कमी करण्यासाठी हे उपाय नक्की करा
वजन नियंत्रणात ठेवा. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवा.
अल्कोहोलचे सेवन कमी करा. यामुळे रक्तदाब २-४ mm Hg ने कमी होतो.
योगासने, प्राणायाम यासारखे व्यायाम नियमितपणे करा.