नोव्हेंबर महिन्यापासून थंडीची चाहूल लागते. या दिवसांमध्ये शरीरातील आर्द्रता कमी झाल्याने त्वचा कोरडी पडते. ज्यांची त्वचा जास्त कोरडी असते त्यांचे ओठही कोरडे पडतात. ओठांची त्वचा निघते, कधी कधी ओठातून रक्तही येऊ लागते. ओठ सारखे कोरडे पडत असल्याने त्यावरुन नकळत जीभ फिरवली जाते. पण यामुळे ते तात्पुरते ओले होतात आणि काही वेळातच पूर्वपदावर येतात. याशिवाय बाजारात सहज उपलब्ध होणारे लिप बाम, मॉईश्चरायझर यांचा ओठ मुलायम राहण्यासाठी वापर केला जातो. परंतु अशा सौंदर्यप्रसाधनांमुळे बरेचदा या कोरडेपणाचे प्रमाण वाढते. त्यामुळे घरच्या घरी करता येतील असे काही सोपे उपाय पाहूयात…
१. लोणी किंवा तूप लावा – लोणी आणि तूप हे अतिशय उत्तम नैसर्गिक मॉईश्चरायझर आहेत. रोज रात्री झोपताना ओठांना लोणी किंवा तूप लावल्यास त्याचा चांगला फायदा होतो. हलक्या हाताने हे लावून मसाज केल्यास ओठ फाटणे कमी होईल.
२. एरंडेल ऑईल – थोडेसे व्हॅसलिन घेऊन त्यात एरंडेल तेल घालावे. हे मिश्रण दिवसातून दोनदा ओठांना लावावे. त्यामुळे ओठ मुलायम होण्यास मदत होते.
३. मोहरीचे तेल – मोहरीचे तेल अनेक समस्यांसाठी उत्तम उपाय असते. थंडीच्या दिवसात दर दिवशी नाभीत मोहरीच्या तेलाचे दोन ते तीन थेंब टाकल्यास त्याचा चांगला फायदा होतो. यामुळे ओठ फाटण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.
४. गुलाब पाणी – गुलाब पाणी हा कोरड्या ओठांसाठी अतिशय उत्तम उपाय आहे. एक लहान चमचा गुलाब पाण्यामध्ये तीन ते चार थेंब ग्लिसरीन टाकून ठेवावे. दिवसातून तीन ते चार वेळा हे मिश्रण ओठांना लावल्याने ओठांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.