थोडीशी थंडी सुरू झाली तरी ओठांना चिरा पडणे किंवा ओठांच्या त्वचेची साले निघणे, ओठ फाटणे अशा गोष्टींच्या त्रासदायक अनुभवाला कित्येकांना सामोरे जावे लागते. ओठांची काळजी घेण्यासाठी बाजारात अनेक क्रीम, लीप बाम उपलब्ध असतात. पण, अशा कोरड्या किंवा फाटलेल्या ओठांसाठी बरेचसे घरगुती उपायदेखील आहेत. या घरगुती उपायांमुळे तुमचे ओठ नैसर्गिकरीत्या मुलायम राहण्यास मदत होते.
ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरी अगदी सहजपणे करू शकता असे कोणकोणते उपाय आहेत ते आपण पाहू.

मध

मध तुमच्या ओठाला नैसर्गिकरीत्या मुलायम ठेवण्यासाठी मदत करतो. मधाचा पातळ थर तुमच्या ओठांवर लावा आणि काही मिनिटांनंतर तो कोमट पाण्याने धुऊन टाका. त्यामुळे ओठांच्या त्वचेची साले निघणार नाहीत आणि तुमचे ओठ मऊ राहण्यास मदत होईल.

खोबरेल तेल

खोबऱ्याचे तेल ओठांसाठी खूप फायदेशीर आहे. ओठांना आवश्यक ते पोषण देऊन, ओठांची काळजी घेण्याचे काम खोबरेल तेल करीत असते. खोबरेल तेलाचे एक-दोन थेंब ओठांवर लावल्याने ओठ हायड्रेट होऊन, मऊ होतात. दिवसभरातून तुम्हाला आवश्यकता वाटेल, तेव्हा तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करू शकता.

कोरफड

कोरफडीमध्ये अँटीइम्फ्लेमेटरी घटक असतात. सोबत मॉइश्चरायझिंग घटकदेखील असतात; जे फाटलेल्या वा साले निघालेल्या ओठांची काळजी घेतात. कोरफडीच्या पानांतून काढलेल्या गराचा किंवा दुकानातून आणलेल्या कोरफड लीप बामचा पातळ थर आपल्या ओठांवर लावा. त्याने तुमचे ओठ मऊ राहण्यास मदत होईल.

हेही वाचा : DIY : थंडीत बिनपाण्याने करा केसांना शाम्पू! घरातील केवळ या तीन गोष्टींनी होईल शक्य; पाहा ही ट्रिक….

काकडी

काकडीमध्ये नैसर्गिकरीत्या भरपूर पाणी असल्याने तुमच्या कोरड्या ओठांसाठी काकडी फार उपयुक्त ठरते. काकडीच्या पातळ चकत्या करून, काही मिनिटांसाठी त्या ओठांवरून फिरवा. हा प्रयोग तुम्ही दिवसातून कितीही वेळा करू शकता.

गुलाबाच्या पाकळ्या

गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये नैसर्गिकरीत्या तेलाचा अंश असतो; जो कोरड्या किंवा साले निघालेल्या ओठांसाठी उपयुक्त ठरतो. गुलाबाच्या काही पाकळ्या घेऊन, त्या दूध किंवा ग्लिसरिनमध्ये काही तासांसाठी भिजवून ठेवा. आता या भिजवलेल्या पाकळ्या अगदी बारीक करून, त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट १५ मिनिटांसाठी ओठांवर लावून ठेवा आणि नंतर ओठ धुऊन टाका.

साखरेपासून बनवलेला स्क्रब

साखरेपासून बनवलेल्या या स्क्रबचा वापर करून, ओठांवरील मृत त्वचा (Dead Skin) काढून टाकण्यास मदत होते; ज्यामुळे ओठ मऊ व मुलायम होण्यास मदत होते. मध किंवा खोबरेल तेलामध्ये साखर मिसळून, त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठांवर लावून, हलक्या हाताने मसाज करा. नंतर ओठ कोमट पाण्याने धुऊन टाका.

ग्रीन टी

वापरलेल्या ग्रीन टीच्या बॅग्स ओठांसाठी खूप उपयुक्त असतात. ग्रीन टीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे ओठांची जळजळ होत असल्यास ती शांत होते. ग्रीन टी बनवल्यानंतर त्यातील ग्रीन टीची बॅग बाहेर काढून, ती थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर ती बॅग आपल्या ओठांवर काही मिनिटांसाठी लावावी. त्यामुळे ओठांची जळजळ कमी होण्यास मदत होईल.

जोजोबा तेल

जोजोबा तेल हे ओठांना मॉइश्चराइज्ड ठेवण्यास मदत करते. जोजोबा तेलाचे काही थेंब आपल्या ओठांवर लावल्याने ओठांना मऊपणा येतो. तुम्ही या तेलाचा दिवसातून कितीही वेळा वापर करू शकता.

पाणी

ओठांना कोरडेपणापासून दूर ठेवण्यासाठी सर्वांत उत्तम उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे. शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण असेल, तर ओठ कोरडे पडणे, ओठांच्या त्वचेची साले निघणे, ओठ फाटणे यांसारख्या समस्या उदभवणार नाहीत. त्यामुळे पाणी योग्य प्रमाणात पिणे गरजेचे आहे.