नवरात्रातील पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे. दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरुप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते. दुर्गा मातेचे पाचवे रूप स्कंदमातेचे आहे. चंदोग्यश्रुतीनुसार, शिव आणि पार्वतीचा मुलगा ‘कार्तिकेय’चं दुसरं नाव ‘स्कंद’ आहे. अशाप्रकारे स्कंदची जननी असल्यामुळे आदिशक्ती जगदंबाच्या या स्वरूपाला ‘स्कंदमाता’ म्हणतात. एक प्रतीक रूपात शिव आणि पार्वतीचं मिलन समजलं जातं. हे दर्शवण्यासाठी ममतारूपात दुर्गा मातेच्या कुशीत एका हाताने ‘स्कंद’ पकडलेलं दाखवण्यात येतं.
एका कथेच्या अनुसार, शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी पार्वतीने अनेक वर्षे तप केले. तप करत करत देवीचा रंग सावळा झाला होता. एक दिवस पार्वती व शंकर हे दोघेही कैलास पर्वतावर बसून हास्य-विनोद करत होते. तेव्हा शंकराने पार्वतीला विनोदाच्या भरात काळी असं म्हटलं. शंकराने आपल्या रंगावरून काळी असं म्हटल्याने तिला खूप वाईट वाटलं. त्यानंतर कैलास पर्वत सोडून पार्वती परत तप करू लागली. त्याच वेळी एक भुकेला सिंह पार्वतीला खाण्याच्या इच्छेने तिथे पोहचला. परंतु तपमध्ये लीन झालेल्या पार्वतीला पाहून तो सिंह सुद्धा शांतपणे पार्वतीला पाहत बसला.
पार्वतीचा तप संपल्यानंतर आपण तिला भक्ष्य करून टाकुया असा विचार सिंहाने केला. त्यामुळे जितके वर्ष पार्वतीने तप केले तितके वर्ष सिंह जागेवरून हलला सुद्धा नाही. अगदी भुकेला आणि तहानलेला सिंह तसाच अनेक वर्षे जागेवर बसून राहिला. पार्वतीचा तप पूर्ण झाल्यानंतर शंकर तिथे प्रकटले आणि गौरवर्णीय होण्याचा आशिर्वाद दिला. त्यानंतर पार्वतीने जेव्हा गंगेत स्नान केलं त्यावेळी तिच्या शरीरातून एक सावळी देवी प्रकटली. या सावळ्या देवीला कौशिकी असं म्हटलं जातं. पार्वती गौरवर्णीय झाल्यानंतर तिला महागौरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पावर्तीला तिच्या तपस्येचे फळ मिळाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की ती तप करत असताना सिंह सुद्धा तिच्यासोबत तप करत होता. त्यानंतर पावर्तीने सिंहाला आपलं वाहन बनवलं. अशा प्रकारे दुर्गा मातेला शेरोवाली माता असं ओळखू जाऊ लागलं. तसंच तिचं वाहन सिंहाला मानलं जाऊ लागलं.
दुर्गा माता आणि शिवकंठ निळा असण्याशी काय संबंध ?
एका कथेनुसार, एक दारुक नावाच्या राक्षसाने ब्रम्हाला प्रसन्न केलं. ब्रम्हाकडून मिळालेल्या वरदानाने हा राक्षस देव आणि ब्राम्हणांना अग्नीप्रलयाप्रमाणे त्रास देऊ लागला. त्याने आपली सर्व धार्मिक अनुष्ठान बंद केले आणि स्वर्गलोकात आपलं राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न करू लागला. हे पाहून सर्व देव, ब्रम्हा आणि विष्णू शंकराकडे आले. या राक्षसाला एक स्त्रीच नष्ट करू शकते, असं ब्रम्हाने सांगितलं. हे ऐकून सर्व देव-देवता, ब्रम्हा आणि विष्णू स्त्री रूप धारण करून या राक्षसाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. पण तो राक्षस इतका बलवान होता की सर्व देव-देवता अयशस्वी ठरले.
ब्रम्हा, विष्णू सह अनेक देव देवता पुन्हा शंकराकडे पोहोचले आणि याविषयी मदत मागितली. हे सारं ऐकून शंकराने पार्वतीकडे पाहिलं आणि राक्षसाला नष्ट करण्यासाठी मदत मागितली. त्यानंतर पार्वतीने तिच्या अंशाच्या रूपात शंकराच्या शरीरात प्रवेश केला. पार्वतीचा हा अंश शंकराच्या शरीरात गेल्यानंतर कंठस्थानी बसून विषाच्या स्वरूपात आकार धारण केलं. विषाच्या प्रभावामुळे शंकराचा कंठ हा निळ्या रंगाचा झाला. पार्वतीचा हा अंश शंकराच्या कंठस्थानी पोहोचल्यानंतर शंकराचा तिसरा डोळा उघडा झाला आणि तिसऱ्या डोळ्यातून विक्राळ रूपी काली माता प्रकटली. काली मातेचे हे विक्राळ रूप पाहून तिथले सर्व देव-देवता देखील पळून गेले. शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातून प्रकटलेल्या काली मातेने राक्षसाला भस्म करून टाकलं.