Navratri Fasting Tips and Benefits : सध्या देशभरात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. नवरात्री हा नऊ दिवसांचा सण असतो. या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अनेक जण नवरात्रीदरम्यान उपवास करतात; पण तुम्हाला माहीत आहे का की, नवरात्रीदरम्यान उपवास करण्याची प्रथा आध्यात्मिक, तसेच शारीरिकदृष्ट्‍याही महत्त्वाची आहे.
अनेक जण उपवास करताना काही पदार्थ वर्ज्य करतात; तर काही लोक फक्त सात्त्विक आहार घेतात. पण, उपवास करताना खालील टिप्सचे अनुसरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

शरीर हायड्रेटेड ठेवा

नवरात्रीच्या उपवासादरम्यान शरीरात पाण्याची कमतरता भासू नये आणि ऊर्जा पातळी टिकवून राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याशिवाय शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी नारळाचे पाणी, हर्बल टी आणि ताज्या फळांचा रस प्या. शरीर हायड्रेटेड राहिल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात.

हेही वाचा : पोट बिघडल्यानंतर काय खावे व काय खाऊ नये? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात?

पौष्टिक पदार्थ खा

फळे, सुका मेवा व बिया यांसारखे आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध असलेले पदार्थ खा. राजगिरा व शिंगाड्याचे पीठ नवरात्रीच्या अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते. हे पदार्थ ऊर्जा देतात आणि या पदार्थांमुळे तुम्हाला फार भूक लागत नाही. त्याशिवाय उपवासादरम्यान तुम्हाला अशक्तपणा किंवा थकवा जाणवत नाही.

कमी प्रमाणात वारंवार जेवण करा

उपवासादरम्यान एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खाण्याऐवजी दिवसभर थोडे थोडे कमी प्रमाणात खा. त्यामुळे ऊर्जेची पातळी टिकून राहते. दर काही तासांनी फळे, सुका मेवा, दही खा. त्यामुळे तुमची चयापचय क्रिया संतुलित राहते आणि तुम्हाला थकवा जाणवत नाही.

फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा

फळे, भाजीपाला, राजगिरा व साबुदाणा यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खाल्याने दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. हे पदार्थ शाश्वत ऊर्जा प्रदान करतात, जे उपवासादरम्यान अत्यंत फायदेशीर आहे.

तळलेले आणि साखरयुक्त पदार्थ खाणे टाळा

तळलेले स्नॅक्स आणि गोड दार्थ खाणे टाळा. त्यामुळे तुम्हाला आळस येऊ शकतो. तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी फळांपासून तयार केलेले पदार्थ, भाजलेले स्नॅक्स इत्यादी हलके व आरोग्यदायी पदार्थ खा.

हेही वाचा : Kitchen Jugaad : मसाल्याचा बॉक्स उघडल्यानंतर कसा पॅकबंद करावा? VIDEO पाहा अन् जाणून घ्या भन्नाट ट्रिक

प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा

प्रोटीनचा मुख्य स्त्रोत म्हणजे दही, कॉटेज चीज (पनीर) व सुका मेवा. प्रोटीन्स हे स्नायूंचे आरोग्य व ऊर्जा वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. उपवासादरम्यान प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने फार भूक लागत नाही.

जेवणाचे आधीच नियोजन करा

उपवासाच्या खाद्यपदार्थांचे नियोजन केल्याने उपवासादरम्यान काय खावे, याविषयी तुम्हाला फार विचार करावा लागत नाही. उपवासाला खाता येईल अशा पदार्थांची यादी तयार करा. पौष्टिक पदार्थ, फळे, सॅलेड्स किंवा पौष्टिक स्नॅक्सचा यादीमध्ये समावेश करा. भूक लागल्यानंतर तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता.

सैंधव मीठ वापरा

नवरात्रीदरम्यान, पदार्थांमध्ये सैंधव मीठ वापरा. या सैंधव मिठामध्ये भरपूर खनिजे असतात आणि ते पचनास मदत करतात. त्यामुळे उपवासादरम्यान सैंधव मीठ एक उत्तम पर्याय ठरतो. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून मिठाच्या सेवनाकडे नेहमी लक्ष द्या.

चांगली झोप घ्या

उपवास केल्याने अनेकांना थकवा येतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. नेहमी ताजेतवाने वाटण्यासाठी दररोज रात्री किमान सात-आठ तास झोप घेणे गरजेचे आहे. पुरेशी झोप घेतल्याने दिवसभर उपवासादरम्यान तुमच्यामध्ये उत्साह व ऊर्जा दिसून येईल.