Neeraj Chopra Diet: स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. नीरजने पहिला थ्रो फाऊल केला होता, पण दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने ८८.१७ मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. २५ वर्षीय नीरजने याआधी ऑलिम्पिक आणि डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. पण नीरज चोप्रा मैदानात स्वतःला तंदुरुस्त आणि उत्साही ठेवण्यासाठी कसा आहार घेतात हे तुम्हाला माहिती आहे का? नीरजचे लहानपणी वजन ८० किलो होते. आता लठ्ठपणावर कशी केली मात, चला तर जाणून घेऊया.
देशाला पुन्हा सुवर्णपदक मिळाले अन् त्या दरम्यान आता नीरजच्या फिटनेसबाबत देशात चर्चा सुरू झाली. जेव्हा नीरजने ऑलिम्पिक पदक जिंकले तेव्हा तो केवळ २३ वर्षांचा होता. वयाच्या २५ व्या वर्षी त्याचा अप्रतिम फिटनेस पाहून असे म्हणता येईल की तो अजूनही अनेक चॅम्पियनशिप खेळू शकतो आणि देशासाठी आणखी अनेक पदके जिंकू शकतो. भाल्यासारखा उंच आणि पोलाद असलेला नीरज लहानपणी तसा नव्हता. असे म्हणतात की, तो लहानपणी लठ्ठ असायचा आणि त्याचे मित्र त्याची चेष्टा करायचे. आता नीरज त्याच्या तंदुरुस्तीची पूर्ण काळजी घेतो, चला तर मग जाणून घेऊया काय आहे नीरज चोप्राचा बॉडी मजबूत बनवण्याचा डाएट प्लॅन.
(हे ही वाचा : “चिमूटभर आले अन्…”, हंगामी आजारांपासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ डाएट प्लॅन )
नीरज चोप्राचं डाएट प्लॅन
नीरज चोप्रा आपला आहार साधा ठेवण्याचा प्रयत्न करतो. नीरज आपल्या दिवसाची सुरुवात नारळपाणी किंवा फळांचा रस पिऊन करतो. सकाळच्या नाश्त्याला तो फळे, मायक्रोन्यूट्रिएन्ट्स आणि प्रोटीनचे सेवन करणे पसंत करतो.
नीरज चोप्रा त्याच्या आहारासोबतच फिटनेसकडे विशेष लक्ष देतो आणि त्याच्या नाश्त्यात ब्राऊन ब्रेड आणि ऑम्लेट नक्कीच असतो. तो फॅट-फ्री खाण्यास प्राधान्य देतो, म्हणून तो बहुतेकदा सॅलड आणि फळं खातो, जेणेकरून शरीरात ऊर्जा टिकून राहते.
प्रोटीनसाठी नीरज अंडी, मासे, चिकन खात असला तरीही सुरुवातीपासून शाकाहारी असल्याने टोफू किंवा पनीर खाणे त्याला जास्त आवडते. नीरज मॅचच्या दिवशी फक्त सॅलड आणि फळं खाणं पसंत करतो. त्यामुळे शरीरात ऊर्जा राहते आणि सुस्तपणा जाणवत नाही.
लंच आणि डिनरसाठी ग्रील्ड चिकन ब्रेस्ट, ग्रील्ड सॅल्मन आणि अंडीचा आहारात समावेश करतो.
हेल्दी डाएट व्यतिरिक्त, नीरज दिवसाचे सहा ते सात तास व्यायाम करतो. त्याचा स्टॅमिना वाढवण्यासाठी तो रोज धावतो. डंबेल फ्रंट आणि साइड वाढवण्याच्या व्यायामावर जोर देणे, वजन उचलणे हा एक नियमित व्यायाम आहे जो खांद्यांना मजबूत करतो. यामुळे त्याला लांब भाला फेकण्यास मदत होते. नीरजचे लहानपणी वजन ८० किलो होते. आज तो तंदुरुस्त आणि निरोगी तरुण आहे.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून ‘लोकसत्ता’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)