How To Perfectly Boil Milk: अनेकदा घाई गडबडीत आपण ज्या गोष्टींसाठी जितका वेळ द्यायचा तो देत नाही आणि मग त्याचे उलट परिणाम आपल्या आरोग्यापासून ते मूडपर्यंत सगळ्याच गोष्टीत दिसून येतात.तुम्हीच सांगा तुमचीही इच्छा असते ना, विशेषतः सकाळी जेव्हा कामावर जायची घाई असते तेव्हा सगळ्या कामाचा फास्ट फॉरवर्ड मोड सुरु व्हावा. सकाळी वेळ खाऊ असे काम म्हणजे दूध तापवणे. कच्चे दूध प्यायल्यास पोटाच्या समस्या तसेच सर्दी- खोकल्याचा धोका असतो. पण तुम्हाला माहित आहे का, दूध फक्त तापवणे गरजेचे नाही तर योग्य पद्धतीने व योग्य प्रमाणात उकळवणे आवश्यक आहे. अलीकडेच पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी गॅस फास्ट करून दुध पटापट का तापवू नये याचे कारण सांगितले आहे.
दुधाला वेगाने उकळी आणण्याच्या प्रयत्नात त्यातील साखर व प्रथिने जळू शकतात. त्यामुळे टोपाचा तळ करपण्याची शक्यता असते. जास्त उष्णतेवर दूध उकळल्यानेही दुधावर फेस तयार होतो तसेच दूध उतू जाऊ शकते.
आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी याविषयी अधिक माहिती देत सांगितले की, ” दूध उकळल्यावर त्यातील पाण्याचे बाष्पीभवन सुरू होते आणि इतर घटक जसे की चरबी, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स वेगळे होऊ लागतात.
उच्च तापमानात कोणतेही अन्न शिजवल्याने त्यातील काही पोषक घटक नष्ट होतात यावर भर देऊन गोयल सांगतात की, “संपूर्ण जेवण म्हणून ओळखल्या जाणार्या दुधामध्ये कार्बोहायड्रेट, चरबी आणि प्रथिने पुरेशा प्रमाणात असतात. त्यात आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. दूध उकळल्याने कच्च्या दुधात असणारे बहुतेक हानिकारक जीवाणू किंवा इतर रोगजनकांना मारण्यात मदत होते पण अधिक उष्णता असल्यास पोषक सत्व सुद्धा संपून जाऊ शकतात”
दूध उकळल्यावर काय होते?
दुधामध्ये प्रामुख्याने दोन प्रथिने असतात. केसीन आणि व्हे, ज्यामध्ये अनुक्रमे ८० टक्के आणि २० टक्के दुधाची प्रथिने असतात. कॅसिन, गरम असतानाही, अगदी स्थिर असते. पण दुसरीकडे, व्हे प्रोटीन वेगाने जळू शकते. तसेच दूध अति गरम केल्यावर, काही फॅट्स हे फॅटी ऍसिडस् रूपांतरित होतात.
हे ही वाचा<< भारती सिंहने खाण्यावर प्रचंड प्रेम असताना १५ किलो वजन कमी कसं केलं? फॅन्सना सांगितले ‘हे’ ४ सिक्रेट फंडे
दूध उकळताना गॅस कधी बंद करावा?
जेव्हा तुम्हाला टोपाच्या काठावर हवेचे फुगे तयार होत असल्याचे दिसले, तेव्हा गॅस बंद करा, दूध जितके जास्त गरम केले जाईल तितके प्रथिने नष्ट होण्याची शक्यता जास्त आहे. मेलार्डच्या प्रतिक्रियेमुळे, जास्त उष्णतेवर शिजवल्यावर दुधाची चव आणि रंग बदलू शकतो. तसेच, जर तुम्हाला वरचा फेस पूर्णपणे टाळायचा असेल तर दूध अधूनमधून ढवळत राहा.