अर्जेंटिनामधील एका कंपनीने सुरक्षित शरीरसंबंधांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. ट्युलीपॅन या सेक्स टॉय बनवणाऱ्या कंपनीने बाजारामध्ये एका नवीन पद्धतीचा कंडोम तयार केला आहे. चार हतांनीच या कंडोमचे पाकीट घडले जाते असं या कंपनीने आपल्या जाहिरातीमध्ये म्हटले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंडोमच्या पाकिटाच्या चारही कोनांवर समान दाब दिल्यानंतरच ते उघडेल. शरीरसंबंध ठेवण्यासाठी दोघांची परवाणगी असेल तरच या कंडोमचा वापर करता येईल या उद्देशाने अशाप्रकारेच पॅकेजिंग करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. ‘जर होकार नसेल तर नकारच’ अशी या कंडोमच्या जाहिरातीची टॅगलाइन आहे. या वर्षाअखेरीसपर्यंत हा कंडोम बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या कंपनी या कंडोमची चाचणी करण्यासाठी अनेक बार्समध्ये या कंडोमचे मोफत वाटप करत आहे. सोशल मिडियावरही या कंडोमची चांगलीच चर्चा आहे.

‘ट्युलीपॅन नेहमीच सुरक्षित शरीरसंबंध ठेवण्यासंदर्भात जनजागृती करत आहे. मात्र यावेळेस शरीरसंबंध ठेवताना सर्वात महत्वाची गोष्टच जाहिरातीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन आमच्यासमोर आहे. जर दोघांचा होकार असेल तरच शरीरीसंबंधांचा आनंद घेता येतो’, असं मत या कंडोमच्या जाहिरातीची जबाबादारी असलेल्या बीबीडीओ कंपनीच्या जॉक्वीन कॅम्पीन्स यांनी न्यू यॉर्क पोस्टशी बोलताना व्यक्त केले.

मीटू मोहिमेनंतर हा कंडोम तयार करण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याचे बोलले जात आहे. या मोहिमेमध्ये अनेक मोठ्या व्यक्तींवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले. त्यामुळेच होकार असेल तरच शरीरसंबंध ठेवता येण्यासंदर्भात कंपनीने केलेला हा एक प्रयत्न आहे. याआधी जिलेट या कंपनीनेही जाहिरातींच्या माध्यमातून मीटू मोहिमेला समर्थन दिले होते.