दृष्टी सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या डोळ्यांवरील ‘लॅसिक’ शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या समस्या दूर होण्याऐवजी त्यात आणखीच वाढ होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.
अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाच्या व्यवस्थापकीय प्रमुख मालव्हियन आयडेलमॅन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दृष्टीतील अडचणी, डोळे कोरडे पडणे आणि दृष्टी समाधान आणि लेझर इन्सिटय़ू केरॅटोमिल्युसिस (लॅसिक) शस्त्रक्रियेनंतरचे परिणाम यांचा अभ्यास केला. पीआरओडब्ल्यूएल- १ अभ्यासात त्यांनी नौदलातील सरासरी २९ वर्षांच्या अधिकाऱ्यांचा समावेश केला. तर पीआरओडब्ल्यूएल- २ अभ्यासात ३१२ सामान्य नागरिकांचा (सरासरी वय ३२ वर्षे) यांचा समावेश केला. पाच वेळा विविध प्रकारे त्यांच्या दृष्टीच्या नोंदी घेण्यात आल्या. यामध्ये लॅसिक शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांचीही समावेश होता. पाहताना येणाऱ्या अडचणी तसेच लॅसिक शस्त्रक्रियेनंतर झालेला त्रास किंवा लाभ अशा प्रश्नांचा समावेश असलेली प्रश्नावली या रुग्णांकडून भरून घेण्यात आली. १ आणि २ क्रमांकाच्या अभ्यासात समावेश असलेल्या रुग्णांकडून १ वर्षे ३ महिने प्रश्नावली भरून घेण्यात आली तर २ क्रमांकाच्या अभ्यासातील रुग्णांकडून सहा महिने वेगळी प्रश्नावली भरून घेण्यात आली. त्यानंतर संशोधकांनी विविध डोळ्यांच्या समस्यांमधील पडताळणी करून हे संशोधन मांडले आहे.
लॅसिक शस्त्रक्रियेनंतर समोरची प्रतिमा दुहेरी दिसणे, अस्पष्ट दिसणे, प्रकाशात डोळ्यांसमोरील प्रतिमा धूसर होणे आणि प्रकाशात गेल्यावर त्रास होणे असे प्रकार वाढत असल्याचे संशोधकांनी मांडले आहे. ‘जामा ऑप्थॅल्मोलॉजी’ या मासिकात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)