आई-वडील होणे हे जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र नातं आहे. जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा त्या बाळाला आई-वडील अगदी फुलासारखे जपतात. पालक म्हणून खरा प्रवास तेव्हाच सुरू होतो. बाळाचे संगोपन करण्यापासून सर्व जबाबदारी आई आणि वडील दोघांनाही उचलावी लागते. काळानुसार पालकत्वाचे स्वरुपही बदलत आहे. बदलत्या जीवनशैलीपासून आपल्या सवयींपर्यंत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. अशा स्थितीमध्ये पालक म्हणून स्वत:मध्ये बदल करणेही आवश्यक आहे. टीव्ही, इंटरनेट, मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या जगात जन्माला येणारी नवी पिढी आधीपेक्षा वेगळी आहे, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि सहाजिकपणे त्यांचे समस्या सोडवण्याचे मार्गही वेगळे आहेत. अशा परिस्थितीमध्ये आजच्या काळात मुलांचे संगोपन करताना, त्यांच्यावर संस्कार करताना पालकांच्या समोर नक्की काय आव्हाने आहेत हे आधी जाणून घेतले पाहिजे आणि पालक म्हणून आपण कुठे चुकत आहोत, याचे मूल्यमापन करून स्वत:मध्ये बदल घडवला पाहिजे. चला तर मग, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या काळात पालकांना भेडसावणाऱ्या समस्या

१)करिअर आणि कुटुंब :
आजच्या काळात नोकरी करणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. पुरुषांबरोबर स्त्रियादेखील नोकरी करतात. त्यामुळे पालकांना पुरेसा वेळ मुलांना देता येत नाही. नोकरी करून मुलांना सांभाळणे म्हणजे पालकांना तारेवरची कसरतच करावी लागते. याबाबत लोकसत्ताला माहिती देताना आगा खान फाऊंडेशनच्या समुदाय संघटक, पालकत्व अभ्यासक, प्रियांका सोनवणे यांनी सांगितले की, “आजकाल संयुक्त कुटुंबाची संकल्पना हळू हळू कमी होत आहे आणि एकल कुटुंबाची संकल्पना हळू हळू समाजात रुजते आहे. अशावेळी आई-वडिलांसमोर बाळाला सांभाळावे कसे असे आव्हान असते. संयुक्त कुटुंबांत नातेवाईकांची थोडी फार मदत मिळत असली, तरी पालक म्हणून पहिली जबाबदारी ही आई-वडिलांची असते.”

२) मुलांचा एकटेपणा वाढतो :
पालकांना मुलांना पुरेसा वेळ न देता आल्याने मुलांमध्ये एकटेपणा वाढतो आहे. त्यामुळे मुलांच्या मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. एकटेपणा घालवण्यासाठी मुले मोबइल आणि इंटरनेटच्या आहारी जाऊ शकतात. याबाबत प्रियांका सांगतात की, “बाळासाठी पहिले दोन वर्ष अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात मुलांबरोबर वेळ घालवणे, त्यांच्याबरोबर खेळणे, नवनवीन गोष्टी मुलांना शिकवणे, त्यांना गोष्टी सांगणे, गाणे म्हणणे अशा गोष्टी त्यांना शिकवल्या तर त्यांच्या मेंदूचा विकास होतो. असं नाही केल तर मुलांच्या विकासात अडथळे येतात.”

तसेच लोकसत्ताला माहिती देताना मुंबईतील अंधेरी येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रश्मी जोशी-शेट्टी यांनी याकडेही लक्ष वेधले की, “अनेकदा आपला एकटेपणा दूर करण्यासाठी मुलं मोबाइल आणि इंटरनेटचा वापर करतात. सोशल मीडियाद्वारे कम्युनिटी किंवा ग्रुप जॉईन करतात. पण, मुले इंटरनेटवर काय पाहत आहेत? काय करत आहेत, याबाबत पालकांना मात्र काहीच माहीत नसते. अनेकदा मुले इंटरनेटवर गेम खेळतात. पालकांचे मुलांकडे लक्ष नसेल तर हळू हळू मुलांना त्याचे व्यसन होऊ लागते.”

३) मोबाइल आणि इंटरनेटचा अतिवापर :
मोबाइल, लॅपटॉप आणि इंटरनेटच्या काळात मुलांना त्यापासून लांब ठेवणे अशक्य झाले आहे. असा एकही दिवस जात नाही जेव्हा मुले मोबाइल, आयपॅड, लॅपटॉपसारखे गॅजेट्स वापरत नाही. मुलांचा स्क्रीन टाईम वाढत असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि मनावर विपरित परिणाम होतात. मुले बाहेर खेळायला जात नाही, त्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल होत नाही. तसेच वाढत्या स्क्रीन टाईममुळे त्यांच्या डोळ्यांवरही परिणाम होत आहे.

याबाबत प्रियांका यांनी सांगितले की, “मुलांना कधीही वळण लावायचे नसते, आई-वडिलांनी स्वत:ला वळण लावायचे असते. कारण लहान मुलं ही आई-वडिलांना बघून कोणत्याही गोष्टी शिकत असतात. त्यामुळे आपलं मुल जसे घडवायचे आहे, त्याप्रमाणे आधी आई-वडिलांनी वागणे अपेक्षित असते. जर घरात मोठी माणसे टीव्ही पाहत असतील, रील्स पाहत असतील, मुलंही तेच करणार. टीव्ही किंवा मोबाइलवर सतत नवीन चित्र दिसत असतात, नवे रंग दिसत असतात; त्यामुळे मुलं त्याकडे आकर्षित होतात. मुलांना नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते.”

याबाबत सहमीत दर्शवत डॉ. जोशी यांनी सांगितले की,”आई वडील कामावर असतील अनेकदा मुलांना मोबाईल दिला जातो यातून मुलांना मोबाईल वापराची सवय लागून त्याचे रूपांतर हळूहळू व्यसनात होण्यास सुरवात होते. अभ्यास करण्यासाठी मोबाईल आणि लॅपटॉप दिला जात असेल तर मुलं त्यावर काय पाहत आहे याकडे पालकांचे दुर्लक्ष्य होते.”

हेही वाचा – Lazy Parenting म्हणजे आळशी पालक नव्हे! मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पालकत्वाची नवी संकल्पना

४) जेवताना मुलांना टीव्ही लावून देणे किंवा मोबाइल देणे –
अनेकदा आपण पाहतो की मुलं जेवत नाही म्हणून त्याच्या हातात फोन देतात किंवा टीव्ही लावून देतात. मुलांचं लक्ष विचलित करून त्यांना खाऊ घालणे. काहीतरी पोटात जातेय असा विचार पालक करतात; पण असे अन्न मुलांच्या अंगी लागत नाही. याबाबत प्रियांका सांगतात की, “हे अत्यंत चुकीचे आहे, त्यामुळे मुलांना जेवणाची चव कशी आहे समजत नाही, आपण काय खात आहोत याकडे दुर्लक्ष होते. अनेकदा खूप काळजीपोटी मुलांना जेवणाजवळ येऊ दिले जात नाही किंवा जेवताना लक्ष ठेवावे लागत असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला सारखे त्याला घेऊन बसावे लागते. त्यामुळे जेवण एकत्र बसून, शांतपणे करायचे असते हे बाळाला माहीतच होत नाही.”

५) वाढती स्पर्धा आणि मुलांचा अभ्यास :
आजच्या काळात स्पर्धा अत्यंत वाढली आहे. अगदी शाळेपासून नोकरी आणि व्यवसायापर्यंत सर्वत्र स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेचा परिणाम मुलांच्या अभ्यासावरही होत असतो. “आजच्या काळात अभ्यासक्रमही बदलत आहे, त्यामुळे मुलांवर आधीपासूनच अभ्यासाचा खूप ताण असतो. त्यात पालकांच्या अपेक्षांचे ओझ वाढले तर हा ताण आणखी वाढतो. प्रत्येक पालकाची इच्छा असते की, “आपल्या मुलाला चांगले गुण मिळावे.” “अनेकदा पालक आपल्या मुलाची इतरांसह तुलना करतात, त्याचा मुलांच्या मनावर परिणाम होत असतो”, असे प्रियांका यांनी सांगितले.

६) पालक आणि मुलांमध्ये संवाद नसणे :
पालकांच्या भूमिकेमध्ये असताना अनेकदा मुलांचे सर्व निर्णय पालक स्वत:च घेतात. मुलांना काय हवे किंवा नको हे विचारात घेत नाही. मुलांच्या भल्यासाठी पालक जे काही करतात ते योग्य आहे, अशी पालकांची भूमिका असते. मुलांनाही पालकांना आपल्या मनातील गोष्ट सांगताना भीती वाटते, कारण आपल्याला ओरडा बसेल किंवा पालक समजून घेणार नाही, असे मुलांना वाटते. “पालक आणि मुलांमध्ये संवाद नसल्यामुळे किंवा पालक आणि मुलांमध्ये मैत्रीपूर्ण नाते नसल्यामुळे हे घडते. “मुलं आपल्या मनातील काहीतरी येऊन पालकांना सांगतील असे नाते तयार झालेले नसते.” असे प्रियांका यांनी सांगितले

तर “मुलांना घरातील मोठ्या निर्णयामध्ये सहभागी करून घेत नाही. अनेकदा पालक मुलांसमोर वाद घालणे आणि एकमेकांशी न बोलणे टाळतात किंवा नातेवाईंकासह झालेल्या वादाची नकारात्मक पद्धतीने चर्चा होते, त्यामुळे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो”, असे डॉ.जोशी यांनी स्पष्ट केले.

७) मुलांचे नको ते हट्ट पुरवणे, मुलांसमोर वाद घालणे :
आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे किंवा आपल्या मुलांना कशाची कमी पडू नये असे प्रत्येक पालकांना वाटत असते, त्यामुळे मुलांना प्रत्येक गोष्ट मागण्याआधीच दिली जाते. मुलांनी कोणतीही गोष्ट मागितली तर पालक नकार देत नाही. मुलांना मोठे गिफ्ट दिले जातात. मुलांना कोणतीही गोष्ट सहज मिळत असल्यामुळे मुलांना त्यासाठी कष्ट करण्याची आवश्यकता वाटत नाही. थोडासा गोंधळ केला किंवा रडारड केली की पालक लगेच मुलांना हवी ती गोष्ट देतात, त्यामुळे मुलांना आपली मनमानी करण्यासाठी हाच मार्ग योग्य आहे असे वाटते. अशावेळी मुलांचा एखादा हट्ट पूर्ण झाला नाही की, अनेकदा ते तोडफोड करू लागतात.

८) मुलांची तुलना करणे किंवा त्यांना दोष देणे.
“अनकेदा पालक मुलांना दोष देतात आणि टोमणे मारतात की, “तू हट्टीच आहे”, “तू ऐकतच नाही”, “तू अभ्यासच करत नाही”; पण हे कधीही नाही केले पाहिजे. मुलांची तुलना इतरांसह करतात, की, “तो बघ किती हुशार आहे, त्याला किती गुण मिळाले, तू ‘ढ’ आहेस”, हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. मुलांच्या भावना दुखावल्या जातात. पालक सतत आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादतात. मुलांना काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. ” असे डॉ. जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा – लग्नाचा बस्ता म्हणजे नेमकं काय? ऐंशी वर्षांची परंपरा अन् काळानुसार बदलेला ट्रेंड; जाणून घ्या इतिहास…

मुलांना सांभाळताना पालकांनी काय करावे

१) आई-वडीलांनी मिळून बाळाला सांभाळले पाहिजे –
करिअर आणि घर सांभाळताना पालकांना तारेवरची कसरत करावी लागते. याबाबत प्रियांका सुचवतात की, “जेव्हा बाळ लहान असते, तेव्हा एकल कुटुंब असेल तर आई-वडील दोघांनी मिळून बाळाचा सांभाळ केला पाहिजे. त्यासाठी पर्याय म्हणून मॅटरनिटी लिव्ह मिळते, तर पहिले वर्ष बाळासाठी आईचा सहवास गरजेचा असतो, तेव्हा त्याचा वापर करावा. त्यानंतर पुढचे वर्ष पॅटरनिटी लिव्ह घेऊन वडिलांनी बाळाला सांभाळावे.”

२) पालकांनी मुलांसमोर जेवणे योग्य असते –
मुलांनी जेवताना मोबाइल फोन किंवा टीव्ही पाहणे टाळावे, यासाठी पालकांनी मुलं जन्मल्यापासून त्यासाठी काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. “बाळ बाजूला खेळत असताना आई-वडील किंवा घरातल्यांनी एकत्र जेवावे. मूल मोठे होत असताना या सगळ्या गोष्टी पाहते आणि त्यातून शिकते की, जेवताना ताट घेऊन जेवायचे असते. मुलंही पालकांची नक्कल करतात. त्यातून मुलांच्या खाण्याच्या सवयी तयार होत असतात, त्यामुळे पालकांनी या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत. मुलांना टीव्ही किंवा मोबाइल देण्याऐवजी मुलांना गोष्टी सांगून त्यांना खाऊ घालावे. त्यांना गाणे ऐकवून त्यांचे मन रमवावे. त्यासाठी पालकांना स्वत:ला काही गोष्टी किंवा गाणी माहीत असली पाहिजेत, त्यामुळे मुलं आनंदी असतात. मुलं अभासी जगात रमण्यापेक्षा खऱ्या आयुष्यात रमतील”, असे प्रियांका यांनी स्पष्ट केले.

३) मुलांसमोर मोबाइल वापरणे आणि टीव्ही पााहणे टाळावे –
जर मुलांनी मोबाइल आणि टीव्हीपासून दूर राहावे असे पालकांना वाटत असेल, तर त्यांनी स्वत: त्या गोष्टी करणे टाळल्या पाहिजे. याबाबत प्रियांका सुचवतात की, फक्त आई-वडीलच नाही, तर घरातील सर्वांनी मिळून काही नियम ठरवावे लागतील आणि त्यांचे पालन करावे लागेल. बाळ झोपलेले असताना किंवा मुलं घरात नसताना मोबाइल वापरणे किंवा टीव्ही पाहणे. शक्य झाल्यास काही काळासाठी घरात टीव्ही न वापरणे, मुलांसमोर कामाशिवाय मोबाइल न वापरणे, मुलं जन्मल्यापासून मुलांसमोर एकत्र जेवण करणे, या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत. “

४) मुलांचा एकटेपणा दूर करण्यासाठी पालकांनी प्रयत्न करावे –
मुलांना एकटेपणा जाणवू नये म्हणून पालकांनी मुलांना वेळ दिला पाहिजे. मुलांशी संवाद साधून त्यांना परिस्थिती समजवणे आवश्यक असते. “आई-वडील दूर असले तरी त्यांचे मुलांवर प्रेम आहे, याची जाणीव मुलांना करून दिली पाहिजे. मुलांसह भावनिक नाते निर्माण केले पाहिजे. सुट्टीच्या दिवशी मुलांसोबत वेळ घालवला पाहिजे. मुलांना काय सांगायचे आहे ते शांतपणे ऐकून घेतले पाहिजे. मुलांना फिरायला घेऊन जायला पाहिजे. मुलांशी मैत्री केली पाहिजे.”असे जोशी यांनी सुचवले आहे.

५) वाढती स्पर्धा आणि मुलांचा अभ्यास :
वाढती स्पर्धा पाहता मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देताना पालकांना सजग राहणे आवश्यक आहे. मुलांवर तुमच्या अपेक्षा लादू नये. अभ्यास करताना मुलांना मोबाइल आणि लॅपटॉप आजकाल द्यावा लागतो, यासाठी प्रियांका सुचवतात की, “वयोगटानुसार मुलांना मोबाइल कसा आणि किती वेळा द्यावा याचे टप्पे ठरवावे लागतील. त्यासाठी पालकांनी मुलांच्या शाळा निवडताना सजग असले पाहिजे. मुलांच्या अभ्यासाकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. मुलांना अभ्यास काय दिला जातो किंवा त्यांना किती वेळ मोबाइल किंवा लॅपटॉप दिला पाहिजे, हे त्यांना माहीत असले पाहिजे.मुलं जेव्हा लॅपटॉप किंवा मोबाइलवर अभ्यास करत असतात, तेव्हा त्यांच्या आसपास राहिले पाहिजे. मुलांना अभ्यासासाठी मोबाइल किंवा लॅपटॉप देत असाल तेव्हा काही नियम लावून द्या. उदा. किती वेळ मोबाइल किंवा लॅपटॉप वापरायचा? बेडरूममध्ये मोबाइल किंवा लॅपटॉप न्यायचा नाही.” तसेच मुलांना मोबाइलवर काही माहितीपूर्ण गोष्टी दाखवा, ज्यातून त्यांच्या ज्ञानात भर पडेल. मुलांना आई-वडिलांचा सहवास मिळणे अत्यंत गरजेचे असते. पालकांनी मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे.”

याबाबत सहमती दर्शवताना डॉ. जोशी यांनी या गोष्टीवर भर दिला की, “मुलं मोबाइलवर काय पाहत आहेत, काय नाही याकडे पालकांनी सजग असावे. मुलांवर संशय घेऊ नये. त्यासाठी मुलांचा मोबाइलचा वापर करून झाल्यावर त्यांनी कोणकोणत्या वेबसाईटला भेट दिले हे तपासणे, किती वेळ ते मोबाइल वापरत आहे, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. इंटरनेटवर सर्फिंग करताना मुले चुकीच्या गोष्टींकडे सहज वळू शकतात, त्यामुळे पालकांनी सजग राहावे. वयोगटाप्रमाणे मुलांना काय चांगले, काय वाईट आहे हे सांगावे.”

६) मुलांशी मैत्री करा
मुलांसाठी सर्वात आपलेसे आणि सुरक्षित वाटणारे नाते असते ते आई-वडीलच असतात. पालक म्हणून मुलांशी मैत्री करणे आवश्यक आहे. प्रियांका सांगतात की, “जर तुम्हाला वाटत असेल की, मुलांनी तुमच्याकडे येऊन त्यांच्या समस्या सांगाव्या, तर आधी तुम्हाला मुलांकडे जाऊन तुमच्या समस्या मांडल्या पाहिजे. त्यामुळे मुलांना समजते की, आपल्याला काही समस्या असेल तर आपण आपल्या आई-वडिलांसह बोलू शकतो.

मुलांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे अनेकदा पालकांना खूप उशिरा लक्षात येते. याबाबत डॉ. जोशी सांगतात की, “यासाठी मुलांच्या आवडी निवडी लक्षात घेतल्या पाहिजे. सध्याचा ट्रेंड काय आहे हे पाहिले पाहिजे. मुलांना एखादा चित्रपट आवडत असेल तर त्याबाबत तुम्हाला माहीत असले पाहिजे. मुलांबरोबर छोटी छोटी कामं केली पाहिजेत. मुलांना आपले लहानपणीचे किस्से सांगितले पाहिजे. मुलांशी संवाद साधण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. मुलांना जशा सकारात्मक गोष्टी सांगितल्या जातात, तशाच नकारात्मक गोष्टीदेखील सांगितल्या पाहिजे. मुलांना आपण काय सांगतो आणि कशाप्रकारे सांगत आहोत, याबाबत पालकांनी सजग राहायला हवे. घरात वाद झाल्यानंतर संवाद साधून प्रश्न सोडवले पाहिजे, यातूनच मुलांना वाद कसे हाताळावे हे शिकता येते.”

हेही वाचा – दूध आणि मासे एकत्र खाऊ का नये? मध खाल्यानंतर गरम पाणी का पिऊ नये? ‘विरुद्ध आहारा’बाबत काय सांगते आयुर्वेद, जाणून घ्या

७) मुलांना नकार द्या आणि त्यांना नकार पचवायला शिकवा
मुलांचे प्रत्येक हट्ट पुरवू नये. मुलांना खरंच गरज आहे का, याचा विचार करून कोणतीही गोष्ट मुलांना दिली पाहिजे. मुलांना नाही बोलायला शिकवा. एखादी गोष्ट मुलांना देऊ शकत नसाल तर त्याचे कारण मुलांना व्यवस्थित समजावून सांगा, त्यामुळे मुलांना नकार पचवणे सोपे जाते. याबाबत डॉ. जोशी सांगतात की, “मुलांना गिफ्ट म्हणून मोबाइल किंवा लॅपटॉप देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचा मोबाइल किंवा लॅपटॉप मुलांना वापरायला देऊ शकता, पण गरज नसताना मुलांना महागडे गिफ्ट देऊ नये. अनेकदा नकार देऊन मुलं जर हट्टीपणा सोडत नसतील, ऐकून घेत नसतील किंवा घरात तोडफोड करत असतील तर त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊ जा.

८) मुलांची तुलना करू नये किंवा त्यांना दोष देऊ नका
मुलांना टोमणे मारणे, दोष देऊ नये. मुलांना कोणत्याही प्रकारे लेबलिंग करू नये. मुलांची इतरांसह कधीही तुलना करू नये. प्रत्येक मूल हे वेगळे असते, त्याचे वेगळेपण पालकांनी जपले पाहिजे. मुलांनाही भावना आहे, त्यांनाही दु:ख होते, वाईट वाटते हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. मुलांच्या मनाचा विचारही पालकांनी केला पाहिजे. याबाबत डॉ. जोशी सांगतात की, “प्रत्येक मूल हे इतरांपेक्षा वेगळे आहे आणि ते टिकवून ठेवण्याला पालकांनी प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक मुलांची क्षमता आणि कौशल्य वेगळी असतात. तुमच्या मुलांच्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, हे पालकांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मुलांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक केले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलांना जर खूप प्रयत्न करूनही एखादी गोष्ट जमत नसेल तर त्याचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या शिक्षकांशी संवाद साधा. आवश्यकता असल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.”

पालकांनी कोणत्या चुका टाळाव्या

  • आपल्या मुलांची इतरांसह तुलना करू नये,
  • इतरांसमोर मुलांवर ओरडू नये.
  • मुलांवर कधीही हात उगारू नये किंवा त्यांना मारू नये.
  • मुलांचे नको ते हट्ट पुरवू नये. मुलांना नाही बोलयाला शिका.
  • मुलांचे लेबलिंग करू नये किंवा त्यांना दोष देऊ नये.

पालकांनी कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे.

  • पालक म्हणून आधी स्वत:मध्ये जाणीवपूर्वक बदल केला पाहिजे.
  • पालकांनी मुलांशी मैत्री केली पाहिजे.
  • मुलांच्या भावनांचा विचार केला पाहिजे.
  • मुलांना काय सांगायचे आहे ते ऐकून घेतले पाहिजे
  • मुलांच्या मतांचा आदर केला पाहिजे.
  • मुलांना निर्णय घ्यायला शिकवले पाहिजे.
  • मुलांना नकार पचवायला शिकवले पाहिजे.
  • मुलांचे वेगळेपण जपले पाहिजे. मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
  • मुलांशी संवाद साधला पाहिजे.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New generation parenting problems and solution discipline children parenting tips what to do what to avoid from the experts itdc snk
Show comments