आजकाल बऱ्याच जणांना ब्लड प्रेशरचा त्रास होताना दिसत आहे. अयोग्य जीवनशैली, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव अशा अनेक सवयींमुळे ब्लड प्रेशरची समस्या वाढताना दिसतेय. यामुळे डॉक्टरांकडून वेळोवेळी जीवनशैलीत सुधारणा करण्याचा सल्ला दिला जातो. यावर आता अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी सॅन दिएगो येथील संशोधकांनी ब्लड प्रेशर मोजण्यासाठी सर्वात स्वस्त क्लिप विकसित केली आहे. कोणत्याही मोबाइलच्या फ्लॅश लाइटवर ही क्लिप लावून ब्लड प्रेशर चेक करता येणार आहे. ही क्लिप एका स्मार्टफोन ॲपसह कार्य करते. सध्या ही क्लिप तयार करण्यासाठी सुमारे ५.६ रुपये खर्च येत असल्याचा दावा केला जात आहे, पण हा खर्च भविष्यात ७० पैशांपर्यंत खाली आणता येईल, असा संशोधकांचा दावा आहे.
या क्लिपच्या मदतीने अगदी कमी खर्चात वृद्ध, प्रौढ आणि गर्भवती महिलांना फायदा होऊ शकतो. सध्या ब्लड प्रेशर चेक करण्याच्या एका डिव्हाइसची किंमत सुमारे १००० रुपये आहे. यावर यूसी सॅन दिएगोमध्ये पीएच.डी.चे शिक्षण घेणारे यिनान झुआन म्हणाले की, आम्ही ब्लड प्रेशर मॉनिटरिंगसाठी लागणारा खर्च कमी करण्यासाठी एक स्वस्त डिव्हाइस तयार केला आहे.
यूसी सॅन दिएगोचे प्रोफेसर आणि डिजिटल हेल्थ लॅबचे संचालक आणि वरिष्ठ लेखक एडवर्ड वांग म्हणाले की,
कमी किमतीमुळे या क्लिप कोणालाही दिल्या जाऊ शकतात. तसेच जे नियमितपणे क्लिनिकमध्ये जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी देखील या खूप फायदेशीर आहेत. या क्लिपच्या मदतीने इतर कोणत्याही डिव्हाइसच्या मदतीने तुम्ही कुठेही, कधीही ब्लड प्रेशर तपासू शकता.
ब्लड प्रेशर मॉनिटर करण्यासाठी तुम्हाला ही क्लिप फोनच्या फ्लॅशलाइटशी संलग्न करावी लागेल. ही क्लिप मोबाइल ॲपशी जोडली जाईल. हे ॲप तुम्हाला क्लिप कसे वापरायचे ते देखील दर्शवील. क्लिपमध्ये एक ऑप्टिकल पिनहोलदेखील आहे, ज्यावर तुम्हाला बोट ठेवावे लागेल. बोट ठेवल्यानंतर फ्लॅश लाइट चालू होईल. यानंतर तुम्हाला ॲपमध्ये ब्लड प्रेशरची माहिती मिळेल. ही क्लिप २४ व्हॉलेंटियरवर ट्राय करण्यात आली आहे.