Telecom Regulatory Authority of India (TRAI) ने मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची सुविधा स्वस्त केली आहे. यासाठीचे शुल्क कमी करुन ५ रुपये ७४ पैसे करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना काही फायदा होणार नाही, मात्र टेलिकॉम ऑपरेटर्ससाठी हे दिलासादायक वृत्त आहे.
टेलिकॉम ऑपरेटर्सना प्रत्येक मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी ट्रांजेक्शनसाठी विविध एजेंसींना पैसे द्यावे लागतात. आता नव्या दरांमुळे टेलिकॉम ऑपरेटर्सची प्रत्येक ट्रांजेक्शनमागे होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे. टेलिकॉम ऑपरेटर्सना प्रत्येक नव्या ग्राहकासाठी सध्या 19 रुपये खर्च येतो. हे पैसे Syniverse Technologies आणि MNP Interconnection Telecom Solutions यांसारख्या मोबाइल नंबर सर्व्हिस प्रोवायडर एजेंसींच्या खात्यात जातात. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ३० सप्टेंबरपासून नव्या दरांची अंमलबजावणी करण्यात येईल.
ट्रायने लागू केलेले नवे दर आधीच्या दरांपेक्षा 70% कमी आहेत. यामुळे टेलिकॉम कंपन्यांना फायदा होईल. नवीन दर लागू झाल्यानंतर एअरटेल, व्होडाफोन यांसारख्या देशातील इतर कंपन्यांची वर्षाला जवळपास 75 कोटी रुपयांची बचत होईल.
मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी म्हणजे ग्राहकांना मोबाइल क्रमांक न बदलता, एका कंपनीची सेवा बदलून दुसऱ्या कंपनीची सेवा स्वीकारण्याची सुविधा. २००९ पासून ही सेवा ग्राहकांना पुरविण्यात येत आहे.