कोलेस्टेरॉलच्या चयापचयाची क्रिया नियंत्रित करण्याने स्वादुपिंडाच्या कर्करोगाची शक्यता कमी होते, असे वैज्ञानिकांनी प्रथमच दाखवून दिले आहे. स्वादुपिंडाच्या कर्करोग हा घातक असतो, पण आता त्याच्या उपचारात धमनीकाठिण्य रोधक औषधांचा वापर करता येणार आहे. धमनीकाठिण्यावर आधी विकसित केलेली औषधे ही स्वादुपिंडाच्या कर्करोगावर गुणकारी ठरणार आहेत. अमेरिकेतील परडय़ू विद्यापीठातील जी झिन यांनी सांगितले, की कोलेस्टेरॉलच्या चयापचयावर नियंत्रण मिळवले तर स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा प्रसार रोखता येतो. धमनीकाठिण्यात धमन्यांच्या भित्तिकांवर कोलेस्टेरॉल व इतर पदार्थाचा थर बसून रक्तप्रवाह अडला जातो व त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. संशोधकांच्या मते कोलेस्टेरॉल इस्टर हे संयुग स्वादुपिंडाचा कर्करोग असलेल्या व्यक्तींमध्ये साठत असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे कोलेस्टेरॉलचे इस्टरीफिकेशन व मेटॅस्टॅसिस यांचा संबंधही दिसून आला आहे. इस्टरीफि केशन ही अशी जैवरासायनिक क्रिया आहे, ज्यात कोलेस्टेरॉल हे पेशींमध्ये साठवले जाते व जादा कोलेस्टेरॉल हे कोलेस्टेरॉल इस्टरच्या मेद थेंबाच्या रूपात कर्करोगग्रस्त पेशीत साठवले जाते. त्यामुळे आता स्वादुपिंडाच्या कर्करोगावर नवीन औषधे तयार करता येतील. त्यात कोलेस्टेरॉल इस्टरीफिकेशन प्रक्रियेला दाबून टाकण्याची व्यवस्था केली जाईल, असे इंडियाना विद्यापीठातील जिंगवून झी यांनी सांगितले. मानवी स्वादुपिंडाच्या कर्करोगग्रस्त पेशीत कोलेस्टेरॉल इस्टरचे प्रमाण जास्त दिसून आले आहे. ते कमी केले तर कर्करोगग्रस्त पेशींची वाढ कमी होते, असे परडय़ू विद्यापीठाचे जुनजी ली यांनी म्हटले आहे. पेशीतील एका कोलेस्टेरॉल इस्टर थेंबाचे विश्लेषण रामन स्पेक्ट्रो मायक्रोस्कोपीच्या मदतीने करण्यात आले. त्यामुळे धमनीकाठिण्यावर वापरली जाणारी अ‍ॅवासिमीबीसारखी औषधे या कर्करोगावर वापरता येणार आहेत. स्वादुपिंडाचे निदान झाल्यानंतर काही महिन्यातच रुग्णाचा मृत्यू होतो, त्यामुळे हा घातक रोग आहे. कोलेस्टेरॉल इस्टरीफिकेशन हे अ‍ॅवासिमीबी या औषधाने रोखता येते. त्यामुळे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम या प्रथिने व मेद संश्लेषण करणाऱ्या घटकाची हानी होते. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात, असे ‘ऑन्कोजीन’ या नियतकालिकातील शोध निबंधात म्हटले आहे.

Story img Loader