निसर्गत: प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे असले तरी जो तो आपले व्यक्तिमत्त्व विविधरंगी पेहरावातून अधिक खुलविण्याचा प्रयत्न करत असतो. महाविद्यालयीन तरुणांमध्ये नवनवीन कपडय़ांची फॅशन नेहमीच लोकप्रिय होते. त्यात टीशर्ट आणि जीन्स हा तर जणू या तरुणाईचा गणवेशच. वेगवेगळ्या फॅशनची, स्टाइलची जीन्स महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठी आवडीची असते. कारण इतर कपडय़ांपेक्षा जीन्समध्ये जास्त प्रकार आणि नावीन्य पाहायला मिळते. तसेच वावरण्यासाठी जीन्स अधिक आरामदायी असते. गेल्या काही दशकांपासून भारतातील तरुण मनांवर जीन्सचे गारूड केले असले तरी आज इतक्या वर्षांनंतरही हा प्रकार आपल्या वैविध्यामुळे तितकाच लोकप्रिय आहे. एक काळ होता की जीन्सच्या उत्पादनावर ठरावीक कंपन्यांचा वरचष्मा दिसून यायचाय, अमुक एका कंपनीची जीन्स परिधान करणे म्हणजे स्टेटस सिम्बॉल मानला जायचा. आता बाजार बदललाय. मॉलच्या माध्यमातून वैविध्याचा खजिनाच ग्राहकांपुढे मांडला गेलाय. या बदल्यात जीन्सच्या उत्पादनावर ठरावीक अशा कंपन्यांचा वरचष्मा राहिला असला तरी ग्राहकाला मात्र फिटिंग आणि प्रकारांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वैविध्य मिळू लागले आहे. अगदी लो वेस्टपासून, स्ट्रेट फिट, स्लिम फिट, लुझ फिट अशा नानाविध प्रकारांनी एकाच वेळी जीन्सची जादू तरुणाईच्या मनावर गारूड करताना दिसते आहे.

जीन्स ही प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीला परिधान करायला आवडते. घर, ऑफिसपासून कोणत्याही समारंभात आढळणारी जीन्स ही युवकांच्या ठेवणीतली अविभाज्य भाग बनली आहे. जीन्स म्हणजे आजच्या तरुणाईचा आवडता पेहराव. एक तर जीन्स टीशर्टवर आकर्षक दिसते. तसेच जीन्स दणकट असल्याने कसंही हवं तेव्हा वापरता येते. टिकाऊपणा आणि आगळ्यावेगळ्या ढंगामुळे ती तरुणांबरोबर इतरांमध्येही लोकप्रिय आहे. तसेच तिच्यात अधिक धूळ, डाग सहन करण्याचे गुणधर्म असतात. ओव्हर फेडेड, स्लिम फिट, पेन्सिल बॉटम अशा नानाविध प्रकारांमध्ये जीन्स बदलांना स्वीकारून बाजारात दिवसेंदिवस लोकप्रियतेचे शिखर संपादन करताना दिसते आहे.  फॅशनच्या युगात जीन्स असा एक पेहराव आहे की, तो कधी ‘आउटडेटेड’ (जुना) होत नाही. भविष्यातही हा प्रकार मागे पडेल असे सध्या तरी वाटत नाही. फॅशनच्या प्रवाहात किती पेहराव आले आणि गेले, मात्र फॅशनप्रेमींमध्ये जीन्सची जादू अजूनही कायम आहे. आजच्या आधुनिक युगात लहान मुलांपासून तरुण-तरुणी, सकाळी धावणारे आजोबा ते अगदी ऑफिसात जाणाऱ्या महिलांवर फॅशनेबल जीन्सची जादू आहे. प्रत्येक ऋतूमध्ये जीन्स परिधान केली जाते. जीन्स व्यक्तिमत्त्व खुलवते.

फॅशन दररोज बदलत असते. एवढे असूनही जीन्स परिधान करणाऱ्या व्यक्तीच्या मनात या पेहरावाचे स्थान कायम आहे. आज बाजारात जीन्सचे अगणित रंगप्रकार उपलब्ध आहेत. त्यात लेविस, ली, डेनिम आदी कंपन्यांच्या जीन्स तर नावाने चालतात. जीन्सच्या किमतीचा विचार जर केला तर बाजारात २५० रुपयांपासून तर ५,००० रुपयांपर्यंत जीन्स उपलब्ध आहेत. दररोज ऑफिसात जाताना आपण आपल्या कपडय़ावर इस्त्री फिरवतो व त्यात खूप वेळ जातो. वाया जाणारा वेळ वाचवण्यासाठी एकच उपाय म्हणजे जीन्स! कारण त्यावर बरेच दिवस इस्त्री न फिरवताही वापरता येऊ  शकते. बदलत्या काळानुसार जीन्स परिधान करण्यात परिवर्तन झालेले दिसते. ते म्हणजे कालपर्यंत फॅशन म्हणून ‘हाय वेस्ट’ व ‘मिड वेस्ट’ जीन्स परिधान केली जात होती. मात्र आजच्या फॅशनेबल जमान्यात ‘लो वेस्ट’ जीन्सलाही अधिक मागणी आहे. कमरेच्या जरा खाली परिधान केली जाणारी ‘लो वेस्ट’ जीन्स आधी तरुणींमध्येच प्रचलित होती. आता तर तिने तरुणांमध्येही पंसती मिळवली आहे. जीन्ससोबत तरुणांनी शर्ट, टीशर्ट, शॉर्ट शर्ट, कुर्ता तर तरुणांना टॉप, शर्ट, टीशर्ट, शॉर्ट शर्ट, शॉर्ट कुर्ता परिधान केल्याने प्रत्येक वेळी नवा लुक प्रदान करते. यात हॉट पॅन्ट्स, थ्री फोर्थ, शॉर्ट पॅन्ट्स, स्कर्ट्सही उपलब्ध आहेत. यामुळे तरुणांच्या शब्दांमध्ये, येणारा फंकी, ट्रेंडी लुकही तरुणाईच्या पसंतीस पडत आहे.

सध्या बाजारात स्ट्रेट कट, स्किनीज, लाइट बेलबॉटम असे प्रकार उपलब्ध आहेत. हल्ली तरुणींमध्ये स्किनीजची चलती आहे. कमरेपासून ते अगदी पायाच्या घोटापर्यंत घट्ट असा हा जीन्सचा प्रकार सध्या तरुणींच्या मनावर राज्य करीत आहे. ही जीन्स दिसायला आकर्षक असते. परंतू शरीरयष्टी जर जाड असेल तर हा पर्याय स्वीकारार्ह आहे का याविषयी अजूनही अनेक तरुणींमध्ये वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात. बाजारात हाय वेस्ट, मिड वेस्ट आणि लो वेस्ट असे तीन प्रकार उपलब्ध आहेत. पोट सपाट असलेल्या व्यक्ती लो वेस्ट किंवा हाय वेस्ट जीन्स परिधान करताना दिसतात. या जीन्समध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसते. काहींच्या पोटाला थोडाफार फुगीरपणा असतो, अशा व्यक्ती मिड वेस्ट प्रकाराची जीन्स घालणे पसंत करतात.

डेनिम, कार्गो, लुझर्स ली, लिवाइस, स्पायकर यांसारख्या कित्येक ब्रँड्सच्या जीन्सची मागणी जास्त आहे. जीन्समध्ये कोणता प्रकार घ्यायचा हे प्रसंगाप्रमाणे ठरते. महाविद्यालयात वापरण्यासाठी स्पायकर, डेनिम, तर प्रवासासाठी कार्गो, सिक्स पॉकेट. ब्रँडेड जीन्सची किंमत जास्त असली तरी ती टिकण्यास चांगली असते.

जीन्सचे फायदे

  • जीन्सची फॅशन कधी जुनी होत नाही.
  • जीन्सवर वारंवार इस्त्री करण्याची गरज नाही.
  • फॅशनसोबत जीन्स आरामदायकही आहे.
  • जीन्स लवकर फाटत नाही.

Story img Loader