मलेरिया हा डासांमुळे होणारा रोग जगात दर वर्षी अनेक बळी घेत असतो, पण आता मलेरियाच्या परोपजीवी जंतूने निरोगी लाल रक्तपेशींवर आक्रमण करू नये यासाठी एक नवीन प्रथिन शोधून काढले आहे. त्यातून मलेरियावर नवीन औषध तयार करता येणे शक्य आहे.

वॉल्टर अँड एलिझा हॉल इन्स्टिटय़ूटच्या प्रा. अ‍ॅलन काउमन यांनी हे संशोधन केले असून त्यात मलेरियाचा परोपजीवी जंतू हा काही प्रथिने काढून टाकली तर निरोगी रक्तपेशीत प्रवेशच करू शकत नाही असे निष्पन्न झाले आहे. जगात दर वर्षी निम्म्या लोकसंख्येला मलेरियाची लागण होते. त्यात २० कोटी लोकांना त्या परोपजीवी जंतूचा प्रादुर्भाव होऊन मलेरिया होतो व दर वर्षी साडेचार लाख लोक मलेरियाने मरतात. त्यात पाच वर्षांखालील मुलांचा समावेश जास्त आहे. सध्याची मलेरियाविरोधी औषधे ही फारशी प्रभावी ठरत नाहीत कारण परोपजीवी जंतूत त्या औषधांवर प्रतिकारक्षमता तयार झाली आहे. काऊमन व त्यांच्या चमूने असे दाखवून दिले की, आरएच ५, आरआयपीआर व सीवायआरपीए या तीन प्रथिनांचे एक गुंतागुंतीचे प्रथिन बनते त्यामुळे प्लास्मोडियम फाल्सिपारम हा मलेरियाचा जंतू मानवी रक्तपेशीत प्रवेश करतो. आरआयपीआर किंवा सीवायआरपीए प्रथिने काढून टाकली तर मलेरियाचा परोपजीवी जंतू तांबडय़ा रक्तपेशीत जाऊ शकत नाही त्यामुळे मलेरियाचा संसर्ग होऊ शकत नाही. या प्रथिनांचे कार्य समजून घेऊन मलेरियावर नवी लस तयार करणे शक्य आहे. मलेरिया परोपजीवी जंतू अनेक मलेरियाविरोधी औषधांना विरोध करतो त्यामुळे नवी उपचारांची गरज आहे. सेल होस्ट अँड मायक्रोब या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)