नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण सज्ज आहे. पार्टी आणि जल्लोष करत नव वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे. अनेक जण नव वर्षाचं स्वागत करण्यापूर्वी शेवटच्या दिवशी मद्य पार्ट्यांचं आयोजन करतात. मात्र नवं वर्षाचं स्वागत करताना काही बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मद्य प्राशन करून गाडी चालवणे स्वत:सह इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारं आहे. ३१ डिसेंबरचं औचित्य साधत दरवर्षी पोलीस चौकाचौकात रात्री नाकाबंदी करतात. दारू पिऊन गाडी चालवण्याऱ्यांना पकडतात. जर तुमच्यापैकी कुणी मद्य प्राशन करून गाडी चालवली तर कायद्याने शिक्षा होईल.
मोटार वाहन कायद्यानुसार देशात कुठेही दारू पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा आहे. पकडले गेल्यास वाहतूक पोलीस तुमचे चलन कापून तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. नियमांनुसार वाहतूक पोलीस तुमच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण ब्रेथ अॅनालायझरने तपासतात. १०० मिली रक्तामध्ये ३० मिलीग्रामपेक्षा जास्त आढळल्यास, फक्त तुमचे चलन कापले जाईल किंवा तुम्हाला दंड आकारला जाईल. मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ नुसार जर तुम्ही पहिल्यांदा दारू पिऊन गाडी चालवताना पकडले गेले तर तुम्हाला १० हजार रुपये दंड किंवा ६ महिने तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जर असं करताना पुन्हा पकडले गेल्यास, दंडाची रक्कम १५ हजार रुपयांपर्यंत वाढते आणि २ वर्षांची शिक्षा ठोठावली जाते. दुचाकी असो की, चारचाकी किंवा व्यावसायिक वाहन चालवत असाल. जर अल्कोहोलच्या प्रभावाखाली वाहन चालविल्यास तुम्हाला समान दंड सहन करावा लागतो.
वर्ष २०२२ साठी नॉस्ट्राडेमस यांची भविष्यवाणी; सात घटनांचा केला आहे उल्लेख
देशात सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यासही बंदी आहे. यासाठी प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम आणि दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ही रक्कम ५ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान आहे. याशिवाय तुम्हाला ३ महिने तुरुंगवासही होऊ शकतो. जर नवं वर्षाचं स्वागत करताना तुम्ही अशी चूक केली तर तुम्हाला नवीन वर्षातील काही महिने तुरुंगात घालवावे लागतील.