वनप्लसचा नवा OnePlus Nord 2 नुकताच लाँच झाला आहे. यासोबतच यावेळी OnePlus Buds Pro देखील लाँच करण्यात आले आहेत. हे ‘वनप्लस बड्स प्रो’ सिलिकॉन टिप्स आणि अॅडॉप्टिव्ह नॉइज कॅन्स्लेशनच्या सुविधेसह उपलब्ध असणार आहेत. विशेष म्हणजे कंपनीचा असा दावा आहे की, ‘चार्जिंग केससह या ‘वनप्लस बड्स प्रो’ची (OnePlus Buds Pro) बॅटरी लाईफ तब्बल ३८ तास इतकी असेल. तसेच हे इअर बड्स यूजर्सच्या आजूबाजूचा ४० डेसिबलपर्यंतचा आवाज कमी करण्यास सक्षम आहेत.
ANC तंत्रज्ञानाचा वापर
वनप्लसचा असा दावा आहे की, यातील नव्या फीचर्समुळे हे इअरबड्स खूप चांगले आहेत. यात ३ मायक्रोफोन्स आहेत. ज्यामुळे ह्यातून समोरच्याचा आवाज अत्यंत स्पष्ट ऐकू येईल. चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ ५.२ (Bluetooth 5.2) असणार आहे जो ९४ एमएस (94ms) अल्ट्रा लो लेटेन्सीसह येतो. पाणी आणि घामापासून बचाव करण्यासाठी यामध्ये आयपी ५५ रेटिंग (IP55) दिली गेली आहे. याचसोबत आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या इअरबड्समध्ये एएनसी तंत्रज्ञाचा (Active Noise-Canceling Technology) वापर होणार आहे. ज्यामुळे, युजर्सच्या आजूबाजूचा रिअल टाईम नॉइज (Real Time Noise) नियंत्रणात राहील.
WARP चार्ज सुविधा
कंपनीने असंही सांगितलं आहे कि, ‘वनप्लस बड्स प्रो’मध्ये डॉल्बी एटमॉस आणि ११ मिमीचा डायनॅमिक ड्राइव्हरचा देखील समावेश असणार आहे, ज्यामुळे या इअर बड्सच्या बेसची गुणवत्ता चांगली राहील. पर्सनलाइज ऑडियो अनुभवासाठी आपण याला वनप्लस ऑडिओ आयडी (OnePlus Audio ID) सह जोडू शकता. हे युजर्सच्या सोयीने साऊंड प्रोफाईल अपडेट करण्याचं काम करेल.
‘वनप्लस बड्स प्रो’ वार्प चार्ज (WARP) सुविधा देतात. WARP चार्जमार्फत केवळ १० मिनिटं केलेल्या चार्जिंगवर ते पुढचे १० तास चालू शकतात, असा दावा कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे या ‘वनप्लस बड्स प्रो’ला वनप्लस ९ प्रो (OnePlus 9 Pro) ने वायरलेस चार्ज देखील केलं जाऊ शकतं.
OnePlus Buds Pro ची किंमत किती?
मॅट ब्लॅक आणि ग्लॉसी व्हाइट अशा दोन रंगांमध्ये हे इअर पॉड्स लाँच करण्यात आले आहेत. त्याची किंमत १५० डॉलर म्हणजे सुमारे ११,००० इतकी आहे.