मुंबई : देशभरात आठपैकी एका महिलेला आणि पाचपैकी एकाहून जास्त पुरुषांना ३० ते ३९ या वयातच उच्च रक्तदाबाची बाधा होत असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अहवालातून (एनएफएचएस -५) निदर्शनास आले आहे. महिला आणि पुरुषांमध्ये वयोमानानुसार उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत असल्याचेही यात आढळले आहे.
बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे उच्च रक्तदाबाची बाधा होण्याचे वयही आता ४० च्या खाली आले आहे. देशभरात महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये रक्तदाबाची बाधा होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. सुमारे २१ टक्के महिलांना रक्तदाबाची बाधा झाली आहे, तर सुमारे ३९ टक्के महिला या आजाराच्या पूर्वस्थितीमध्ये आहेत. पुरुषांमध्ये हे प्रमाण काही प्रमाणात जास्त असून सुमारे २४ टक्के जणांना उच्च रक्तदाबाची बाधा झाली आहे. पुरुषांमध्ये सुमारे ४९ टक्के जण आजाराच्या पूर्वस्थितीमध्ये आहेत.
पुरुषांमध्ये रक्तदाबाची बाधा होण्याचे सर्वात जास्त प्रमाण हे ७० आणि त्यावरील वयोगटातील व्यक्तींमध्ये असले तरी ३० ते ३९ वयोगटातही नोंद घेण्याइतपत आहे. या वयोगटातील सुमारे १९ टक्के पुरुष उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत, तर ४० ते ४९ मध्ये हे प्रमाण २८ टक्के आहे. या आजाराच्या पूर्वस्थितीत असलेल्यांचे प्रमाणही २५ ते ५० या वयोगटात सर्वाधिक आहे. २५ ते २९ आणि ३० ते ३९ या वयोगटात या आजाराच्या पूर्वस्थितीत असलेल्यांची संख्या अनुक्रमे ५४ आणि ५५ टक्के आहे. २० ते २४ वयोगटातील सुमारे ५० टक्के तरुणांमध्ये या आजाराची लागण होण्याचा धोका आहे.
स्त्रियांमध्येही हाच कल असून उच्च रक्तदाबाचे सर्वात जास्त प्रमाण हे ७० आणि त्यावरील वयोगटातील महिलांमध्ये आहे. ३० ते ३९ आणि ४० ते ४९ या वयोगटातील महिलांमध्ये याचे प्रमाण अनुक्रमे १३ आणि २५ टक्के आहे. २५ ते २९ वयोगटातील सुमारे ३५ टक्के तर ३० ते ४९ वयोगटातील ४२ टक्के महिलांना या आजाराची बाधा होण्याचा धोका आहे.
राज्यात २३ टक्के जणांना उच्च रक्तदाबाची बाधा
राज्यात सुमारे २३ टक्के महिलांना उच्च रक्तदाबाची बाधा झाली असून सुमारे ३९ टक्के महिला या आजाराच्या पूर्वस्थितीमध्ये आहेत. पुरुषांमध्ये बाधा होण्याचे प्रमाण सुमारे २४ टक्के असून सुमारे ४८ टक्के पुरुष आजाराच्या पूर्वस्थितीमध्ये आहेत.
स्थूल व्यक्तीमध्ये प्रमाण जास्त
बॉडी मास इंडेक्स वाढत जाणाऱ्या पुरुष आणि महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येते. स्थूल व्यक्तीपैकी ४० टक्के पुरुषांना तर २८ टक्के महिलांना उच्च रक्तदाबाची बाधा झालेली आहे.