वर्ल्ड मोबाइल काँग्रेसमध्ये नोकिया ६, नोकिया ३ आणि नोकिया ५ चे लाँचिंग करण्यात आले आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये हे फोन जूनमध्ये येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतर बाजारपेठेमध्ये नवे स्मार्टफोन एप्रिलमध्ये येणार आहेत. त्या तुलनेत भारतीय बाजारपेठेत हा फोन उशिरा येणार आहे. भारतीय बाजारपेठेत नोकिया हा ब्रॅंड प्रचंड लोकप्रिय आहे. फोन एरेनाने दिलेल्या वृत्तानुसार नोकियाचे भारताचे प्रमुख अजेय मेहता यांनी नवे स्मार्टफोन जूनमध्ये दाखल होतील असे म्हटले आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनची भारतातही निर्मिती होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. नोकियासाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे हे नवे स्मार्टफोन आम्हाला लवकरात लवकर भारतात आणायचे आहेत असे मेहता यांनी म्हटले. सुरुवातीच्या काळात नोकियाचा मोबाइल क्षेत्रात दबदबा होता. जेव्हा स्मार्टफोनचा जमाना आला त्यानंतर नोकियाची या क्षेत्रात पीछेहाट सुरू झाली होती. नंतर नोकियाने लुमिया हा फोन विंडोज या ऑपरेटिंग सिस्टमवर सुरू केला. आता नोकियाने अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टम अॅंड्रॉइड नुगटच्या सपोर्टने हा फोन बाजारात आणले आहेत. त्यांच्या या फोनला चीनमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद आहे.
याआधी कंपनीने अॅंड्रॉइडवर चालणारी नोकिया एक्स सिरिज लाँच केली होती. परंतु या फोनला मिळालेल्या अल्पशा प्रतिसादामुळे नोकियाने एक्स सिरीज बंद केली. ५.५ फुल एचडी डिस्प्ले आणि २.५ डी गोरिल्ला ग्लास, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४३० एसओसी, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज, ड्युएल सिम आणि ३,००० एमएएच बॅटरी, फिंगरप्रिंट स्कॅनर, १६ मेगापिक्सल रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, डॉल्बी अॅटमॉस ही या फोनची वैशिष्ट्ये आहेत. काळाची गरज ओळखून नोकियाने ऑपरेटिंग सिस्टममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. नोकिया ६ हा अतिशय सुंदर फोन असून इंटरटेनमेंट आणि डिस्प्ले फीचर्स ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. एचएमडी ग्लोबल ही एक फिनिश कंपनी आहे. या फोनकडे नोकिया या ब्रॅंडच्या विक्रीचे हक्क आहेत. नोकिया या ब्रॅंडला पूर्ण एक नवा लुक देण्याची योजना या फर्मने आखली आहे. येत्या काळामध्ये एकूण चार नवे हॅंडसेट लाँच केले जाणार आहेत. हे नवे फोन ५.० ते ५.७ इंच डिस्प्लेचे असतील. तसेच एकेकाळी आपल्या दमदार बॅटरीसाठी प्रसिद्ध असलेला ३३१० हा फोनसुद्धा कंपनीने लाँच केला आहे. हा फोनसुद्धा भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.