भारतामधील ५ जी सेवेसाठी नोकियाचे महत्त्वपूर्ण पाऊल
फिनलॅण्डमधील सर्वात मोठी कंपनी असणारी नोकिया लवकरच भारतामध्ये ५जी मोबाईल नेटवर्क सेवा सुरू करणार आहे. प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणाऱ्या या ५जी नेटवर्कसाठी नोकिया भारतामध्ये संशोधन आणि विकास केंद्राची बंगळुरुमध्ये स्थापना करणार आहे. या केंद्राच्या प्रमुख रुपा संतोष यांनी माहिती दिली. ५जी मोबाईल नेटवर्कसाठी तयारी आम्ही सुरु केली असून क्लाऊड तसेच मोठ्या डेटा सेंटर्सवर आम्ही विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे रूपा यांनी सांगितले. तसेच २०१८मध्ये या केंद्राशी संबंधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जगभरातील अनेक कंपन्या ५जी नेटवर्कची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. २०२० पासून हे नेटवर्क कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. ५जीमुळे वॉयरस (मोबाईल आणि डेटा टर्मिनल्सच्यामध्ये गतीमान देवणघेवाणीचे मोजण्याचे एकक), डेटा आणि व्हिडिओ ट्रॅफिकबरोबरच ब्रॅण्ड विड्थच्या माध्यमातून जास्तीत जास्त वेगात इंटरनेट सेवा वापरता येतील.
आम्ही आधीच युरोपमधील औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांशी ५जी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी करार केला असल्याची माहिती रुपा यांनी दिली. मात्र, २०१८मध्ये नक्की किती जणांना नोकरी देणार याबद्दलची माहिती अद्याप कंपनीकडून देण्यात आलेली नाही. सध्या कंपनीसाठी भारतात ६ हजार इंजिनियर्स काम करत आहेत. याशिवाय, अमेरिका आणि चीनमध्येही कंपनीची संशोधन केंद्रे आहेत. सध्या एअरटेल भारती आणि बीएसएनएलच्या मदतीने प्रायोगिक तत्वावर भारतात ५जी सेवा सुरु करण्याचा कंपनीचा मानस आहे.