दूध, साखर घालून चहा पिणा-या भारतीय लोकांनी हळूहळू ग्रीन टी पिण्यास सुरूवात केली. पाहायला गेले तर भारतीय चहाच्या तुलनेत हा चहा बेचवच. पण, असे असले तरी ग्रीन टीचे सेवन केल्याने आरोग्याला याचे खूप फायदे होतात. म्हणूनच ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. वजन घटवणे, निद्रानाश, तणाव दूर करणे असे अनेक फायदे ग्रीन टीचे आहेत. काही लोक ग्रीन टी मधासोबत किंवा इतर पदार्थासोबत पितात जे शरिरासाठी घातक ठरु शकतात. ग्रीन टी मध्ये ए, डी, ई, सी, बी, बी 5, एच आणि के विटामिन असतात. याशिवाय मॅगजीन, जिंक, क्रोमियम आणि सेलेनियमसोबत एंटीऑक्सीडेंट गुणही मिळतात जे अनेक रोगांपासून वाचण्यास मदत करतात.

ग्रीन टी मध्ये कोणताही पदार्थ मिसळून त्याचं सेवन करु नये. जर तुम्ही यामध्ये इतर पदार्थ मिसळून पिलात तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. ग्रीन टी ही बेचव असते. त्यामुळे तिला अधिक चांगली चव येण्यासाठी अनेक जण त्यात साखर, मध किंवा गूळ टाकतात. पण असे केल्याने त्यातले पोषक तत्वे कमी होतात. त्यामुळे कधीच त्यात साखर किंवा तत्सम गोड पदार्थ टाकू नका.  ग्रीन टी ही दूध किंवा साखर टाकून बनवायची नसते हे लक्षात घ्या. त्यामुळे ती बनवताना त्यात दूधही टाकू नका.

ग्रीन टीचे प्रकार वेगवेगळे आहे. तुळस, लिंबू, पुदिना, जास्मिन अशा शेकडो प्रकारात ग्रीन टी उपलब्ध आहे. या प्रत्येक प्रकाराचे फायदेही वेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की कोणत्या आरोग्याच्या समस्येसाठी त्याचे सेवन करत आहात हे देखील पाहून घ्या. ग्रीन टीमुळे जरी वजन कमी होत असले तरी तिचे सेवन दिवसातून किती वेळा करावे याबद्दल डॉक्टरांकडून आवश्य सल्ला घ्या. दिवसातून एकदा तिचे सेवन करणे जास्त फायद्याचे ठरेल. ग्रीन टी वारंवार उकळू नका. एकदा ग्रीन टी बनवल्यानंतर लगेचच तिचे सेवन करा. ती ठेवून देऊ नका.
आधी पाणी उकळून घ्या. त्यानंतर त्यात ग्रीन टी पावडर किंवा टी बॅग टाका. हे झाल्यानंतर काही सेकंदात गॅस बंद करा. एकदा पावडर टाकली की नंतर चहा उकळू नका.

ग्रीन टी पिल्यामुळे होणारे फायदे …

निराशा घालविण्यासाठी फायद्याचा
थेनाईन हे अमिनो अॅसिड असते हे अॅसिड चहाच्या पानात असते. निराशा कमी करण्यासाठी म्हणजेच आनंदी राहण्यासाठी शरीराला या अॅसिडची आवश्यकता असल्याने ग्रीन टी घेतल्यास व्यक्तीचे निराशेचे प्रमाण कमी होते.

हृदयरोगासाठी उपयुक्त

रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत सुरु राहण्यासाठी तसेच त्या तंदुरुस्त राहण्यासाठी ग्रीनटी अतिशय उपयुक्त असतो. यामुळे रक्तदाबाचा त्रासही कमी होण्यास मदत होते. शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्यास हृदयरोगाचा धोका असतो. मात्र ग्रीन टी घेतल्याने या गुठळ्या होत नाहीत आणि व्यक्तीचे हृदयरोगाच्या झटक्यापासून संरक्षण होते.

अल्झालमर आणि पार्किनसन्सवर उपयुक्त

ग्रीन टीमुळे मेंदूतील पेशी जास्त चांगल्या पद्धतीने काम करतात आणि या पेशी मृत होण्याचे प्रमाण कमी होते. तसेच खराब झालेल्या पेशींचा पुर्नसंचय करण्यास ग्रीन टी उपयुक्त ठरतो. त्यामुळे अल्झायमर आणि पार्किनसन्स होऊ नये म्हणून ग्रीन टी घेणे फायद्याचे ठरते.

त्वचारोगांसाठी फायदेशीर

वयोमानानुसार शरीरावर येणाऱ्या सुरकुत्या येतात. या सुरकुत्यांचे प्रमाण कमी राहावे यासाठी ग्रीन टी महत्त्वाचे काम करतो. ग्रीन टीमध्ये असणारे काही घटक यासाठी फायदेशीर ठरतात. उन्हामुळे शरीरावर येणारे डाग कमी करण्यासाठीही ग्रीन टीचा उपयोग होतो.

वजन कमी करण्यासाठी उपयोगी

शरीरातील चयापचय क्रीया सुरळीत करण्याचे काम ग्रीन टीव्दारे केले जाते. खाल्लेल्या अन्नाचे कॅलरीत रुपांतर होत असते. हे प्रमाण योग्य राखण्याचे काम ग्रीन टीच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे वाढलेली चरबी आणि वजन कमी होण्यास ग्रीन टी उपयुक्त ठरतो.