आजच्या पिढीमध्ये स्मार्टफोनच्या व्यसनाचा प्रकार काही नवीन नाही. अनेकांना तर जळी-स्थळी काष्ठी पाषाणी मोबाईलच दिसत असल्यामुळे स्मार्टफोनच्या व्यसनाची गंभीर समस्या निर्माण होताना दिसत आहे. या समस्येवर न्यूयॉर्कमधील काही संशोधकांनी ‘नो फोन’ चा पर्याय शोधून काढला आहे. आयताकृती मोबाईल सदृश दिसणारा हा ‘नो फोन’ स्मार्टफोन व्यसनाधीनतेवर प्रभावी उपाय ठरु शकेल, अशी या शास्त्रज्ञांची खात्री आहे. ‘नो फोन’ हा दिसायला जरी, स्मार्टफोनसारखाच असला तरी, त्याप्रमाणे काम करत नाही.
‘किकस्टार्टर’ या संकेस्तस्थळावर ‘नो फोन’ लाँच करण्यात आला असून, या फोनची वैशिष्ट्येदेखील अनोख्या पद्धतीने मांडण्यात आली आहेत. या फोनसाठी तुम्हाला बॅटरीची गरज नाही, वारंवार अपग्रेड करण्याचा त्रास नाही, चुकून हा फोन हातातून खाली पडला तर तुटण्याची भिती नाही, अशी अनेक वैशिष्ट्ये संकेतस्थळावर नमूद करण्यात आली आहेत. त्यामुळे आयफोन किंवा अँड्रॉईड फोनच्या व्यसनातून मुक्त होऊ पाहणाऱ्यांनी ‘नो फोन’ वापरून बघायला काही हरकत नाही. काम न करणाऱ्या या फोनच्या माध्यमातून ३०,००० डॉलर्सचा निधी उभारण्याचा ‘नो फोन’च्या संशोधकांचा प्रयत्न आहे. आता, स्मार्टफोन वापरकर्त्यांकडून स्मार्टफोनचे व्यसन आणि ‘नो फोन’च्या संकल्पनेची खिल्ली उडवली जाईल, परंतू हा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे ‘नो फोन’च्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. स्मार्टफोनचे व्यसन हा प्रकार अस्तित्वात असून, आपल्याला सर्वत्र तो पहायला मिळतो. जीवनातील अनेक महत्वाच्या क्षणामंध्ये मोबाईल फोन लक्ष विचलित करताना दिसत आहे. मात्र, आता ‘नो फोन’च्या रूपाने या समस्येवर उपाय असल्याचे किकस्टार संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे. ‘नो फोन’ हा एक तंत्रज्ञानरहित पर्याय असून यामुळे तुम्हाला तुमचा फोन सतत जवळ असल्यासारखे वाटेल. मात्र, खऱ्या स्मार्टफोनप्रमाणे या फोनमुळे तुमचे लक्ष विचलित होणार नसल्याने तुम्ही वास्तव जगाशी सहजपणे जोडलेले राहू शकता.
स्मार्टफोनच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी ‘नो फोन’चा पर्याय
आजच्या पिढीमध्ये स्मार्टफोनच्या व्यसनाचा प्रकार काही नवीन नाही. अनेकांना तर जळी-स्थळी काष्ठी पाषाणी मोबाईलच दिसत असल्यामुळे स्मार्टफोनच्या व्यसनाची गंभीर समस्या निर्माण होताना दिसत आहे. या समस्येवर न्यूयॉर्कमधील काही संशोधकांनी 'नो फोन' चा पर्याय शोधून काढला आहे.

First published on: 18-09-2014 at 12:08 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now a nophone to stop your smartphone addiction