केंद्र सरकारच्या एका आदेशानंतर आता लवकरच पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण, बँका आता पेन्शन धारकांना त्यांची पेन्शन स्लीप थेट व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवण्यास सुरुवात करणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी केंद्राच्या पर्सोनेल डिपार्टमेंटकडून असे आदेश देण्यात आले होते की, “पेन्शनधारकांना विनाकरण होणारा त्रास टाळण्यासाठी बँकांनी पेन्शन स्लिप त्यांच्या मोबाईल नंबर, SMS, E – Mail, WhatsApp द्वारे पाठवावी.” दरम्यान, केंद्राच्या याच आदेशानंतर आता बँकांनी देखील याबाबतची तयारी दर्शविली आहे. विनाकारण त्रास न होता पेन्शन धारकांना सहजरित्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात याच उद्देशाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. या माध्यमातून पेन्शन धारकांना त्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या रकमेची सविस्तर माहिती SMS आणि E Mail सोबतच WhatsApp सारख्या सोशल मीडिया अॅप्लिकेशनच्या माध्यमातूनही मिळू शकणार आहे. दरम्यान, केंद्राच्या याबाबत दिलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी आता बँका आपल्या पेन्शन धारकांना SMS आणि ई-मेलद्वारे याबाबतची संपूर्ण माहिती देत आहेत.
केंद्राच्या बैठकीत झाला होता निर्णय
गेल्या महिन्यात पेन्शन देणाऱ्या बँकांच्या केंद्रीय पेन्शन वितरण केंद्रांच्या एका बैठकीत पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनबाबत चर्चा झाली. याच बैठकीत पेन्शन धारकांना SMS आणि E Mail सोबतच WhatsApp च्या माध्यमातून पेन्शन स्लिप पाठवण्याबाबतचा निर्णय झाला आहे.
पेन्शन स्लिपमधून मिळणार संपूर्ण माहिती
पेन्शन धारकांना बँकांकडून WhatsApp च्या माध्यमातून मिळणाऱ्या पेन्शन स्लिपमध्ये त्याच्या पेन्शनची आणि बँक खात्यातील रकमेची संपूर्ण आणि सविस्तर माहिती मिळणार आहे. सरकारने पेन्शन धारकांना आपण ईज ऑफ लिव्हिंग अंतर्गत ही सेवा देणार असल्याचे म्हटले आहे.
केंद्र सरकारने बँकांना असे सांगितले आहे की, “दर महिन्याच्या पेन्शन स्लिपमध्ये पेन्शनची रक्कम आणि कर कपातीचा उल्लेख आवश्यक आहे. सोबतच याचा थेट संबंध आयकर, महागाई सवलत आणि महागाई सवलतीच्या थकबाकीशी असल्याने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम हे एक कल्याणकारी उपक्रम म्हणून राबवण्यात यावे. पेन्शनधारकांचे जीवनमान सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.” तसेच बँकांनी देखील याचा स्वीकार केला आहे.