अॅमेझॉनचा (Amazon) व्हॉइस असिस्टंट असलेल्या ‘अलेक्सा’ला (Alexa) आता भारतीय युझर्ससाठी नव्या कोविड १९ संबंधित फीचर्ससह अपडेट करण्यात आला आहे. यामार्गात आता अलेक्सा आपल्या युझर्सना करोना लसीकरणाच्या उपलब्धतेविषयी सर्व तपशीलांसह, करोना चाचणी आणि लसीकरण केंद्रापर्यंत सर्व काहीच शोधण्यात मदत करेल. अॅमेझॉनचे म्हणणं आहे की, यासाठी लागणारी संपूर्ण माहिती ही कोवीन (CoWIN) पोर्टल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाइट्स तसेच मॅपमाय इंडिया यांसारख्या अधिकृत स्त्रोतांमार्फत मिळवण्यात आहे. इतकंच नव्हे तर युझर्सना अलेक्सा कमांडचा वापर करून भारतात करोना काळात आर्थिक मदत करण्याचा अर्थात कोविड १९ कल्याणचा पर्याय देखील दिला जाणार आहे. अमेरिकेमध्ये हे करोनाशी संबंधित फिचर एप्रिल २०२१ मध्ये आणण्यात आलं असून आता भारतात देखील हे फिचर उपलब्ध होणार आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती
लस घेण्यासाठी अपॉइंटमेंट कशी बुक करावी?
अॅमेझॉनचं असं म्हणणं आहे की, नवी दिल्लीतील मॅपमीइंडियाच्या मदतीने अलेक्सा आता जवळची सर्व करोना चाचणी केंद्र शोधू शकते. त्यासाठी तुम्ही कमांड देऊ शकता. पुढे अॅमेझॉनने असंही सांगितलं की, अलेक्सा डिव्हाइस रेजिस्ट्रेशनवरून युझर्सचं लोकेशन ओळखून त्यांच्या जवळच्या लसीकरण केंद्रांची देखील माहिती देऊ शते. युझर्स या माहितीच्याआधारे कोविन पोर्टलवर आपली अपॉइंटमेंट बुक करू शकतात.
अलेक्सा लसीकरण केंद्र शोधण्यात करणार मदत
पिन कोड आणि वय ही माहिती पुरवून युजर्स कोणासाठीही लसीकरण केंद्रं शोधण्यासाठी अलेक्सा वापरू शकतात. मुख्य म्हणजे जर एखादा युझर वेगळ्या ठिकाणी असेल आणि आपल्या मित्र किंवा कुटुंबियांसाठी त्याला दुसऱ्याच ठिकाणच्या लसींची उपलब्धता तपासायची असल्यास हे फिचर उपयुक्त ठरू शकतं. दरम्यान, युझर माहिती विचारात असताना जर कोणत्याही केंद्रात लस उपलब्ध नसेल, तर थोड्या वेळानंतर लसींची उपलब्धता तपासण्यासाठी एक रिमाइंडर देखील सेट केला जाऊ शकतो.
करोनाशी संबंधित अन्य माहिती
याशिवाय, भारतातील लसींच्या कम्प्लिशन रेटबद्दल अपडेट करण्यासह करोना लसीकरणाशी संबंधित अफवा दूर करण्यास देखील अलेक्साचा वापर होऊ शकतो. उदा. लसीची सुरक्षा, नोंदणीची प्रक्रिया आणि प्रत्येक राज्याचा कोविड १९ हेल्पलाइन क्रमांक इ. सर्व माहिती अलेक्सा तुम्हाला देऊ शकते.
अलेक्साद्वारे कोविड १९ कल्याणासाठी करू शकता आर्थिक मदत
अलेक्सा युझर्सना भारतात कोविड १९ कल्याणासाठी देणगी देण्याचा पर्याय देखील देईल. अॅमेझॉनने अक्षय पत्र, गिव्ह इंडिया आणि गूग यासारख्या भारतीय स्वयंसेवी संस्थांशी भागीदारी केली आहे. “अलेक्सा डोनेट नाऊ” अशी कमांड देऊन युझर्सना कोणत्याही स्वयंसेवी संस्थेला देणगी देता येईल. यासाठी युझरला एक अॅप नोटिफिकेशन आणि एसएमएस येईल. त्यामार्फत ते कोणत्याही स्वयंसेवी संस्थेला आर्थिक मदत करू शकतात.
दरम्यान, अमेझॉनने यापूर्वी एप्रिल २०२१ हे फिचर फक्त अमेरिकेसाठी आणले. अमेझॉनचं असं म्हणणं आहे कि, अलेक्साने गेल्या वर्षी करोनाशी संबंधित लाखो प्रश्नांची उत्तर दिली होती. कंपनी म्हणते की, आता अलेक्सा ८५ पेक्षा जास्त देशांसाठी लसीची उपलब्धता आणि पात्रता आवश्यकतांविषयीच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकते.