व्हॉटसअॅप हे मेसेजिंग अॅप अगदी कमी वेळात जगभरात प्रसिद्ध झाले आहे. युजर्सना नवनवीन सुविधा देणाऱ्या व्हॉटसअॅपमध्ये गरजेनुसार सातत्याने नवनवीन बदल करता येत आहेत. फेसबुकद्वारे चालविले जाणारे हे अॅप तरुणांबरोबरच सर्वच वर्गात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. नुकतेच कंपनीने एक मेसेज ५ वेळाच फॉरवर्ड करता येईल असे फिचर आणले आहे. आता दिल्लीतील एक कंपनी असे फिचर आणण्याच्या मार्गावर आहे ज्याद्वारे व्हॉटसअॅपवर काही बोगस बातम्या पसरत असतील तर त्या आपल्याला समजू शकणार आहेत.

आता या फेक न्यूज समजण्यासाठी तंत्रज्ञांनी नेमकी कोणती युक्ती वापरली असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्यांनी असे तंत्रज्ञान विकसित केले आहे ज्याद्वारे आपल्याला व्हॉटसअॅपवर आलेल्या बातम्या खऱ्या आहेत की खोट्या हे पडताळून पाहता येणार आहे. तसेच या बातम्यांचा स्त्रोतही तपासून पाहता येईल. हे एक अॅप असेल जे डाऊनलोड केल्यानंतर ते व्हॉटसअॅपच्या बरोबरीने काम करेल. सध्या त्याच्यावर काम सुरु असून मोठ्या प्रमाणात डेटा एकत्र केला जात आहे. फेक मेसेज रोखण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे.

यामध्ये कलर कोड तयार केले जाणार आहेत ज्याद्वारे मेसेजची सत्यता पडताळण्यात येईल. अॅपमध्ये हिरवा रंग असेल तर तो मेसेज खरा आहे असे समजावे. पिवळा रंग असेल तर सिस्टीमला त्या विशिष्ट मेसेजबाबत पुरेशी माहिती मिळालेली नाही. आणि लाल रंग आल्यास तो मेसेज फेक आहे असे समजावे असे सांगण्यात आले आहे. या प्रकल्पावर संशोधन करणाऱ्यांनी सांगितल्यानुसार, मेसेज मिळाल्यावर लगेच आम्ही त्यातील समान गोष्टींवर काम करायला सुरु करणार आहोत. हा मेसेज म्हणजे एखादा फोटो, लिंक किंवा काही लिहीलेली गोष्ट असू शकते. त्यातही हा मेसेज फॉरवर्ड करण्यात आला असल्यास तो फेक असण्याची शक्यता जास्त असते. येत्या काही महिन्यात हे अॅप तयार होईल असेही अॅप तयार करणाऱ्या कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मागच्या काही काळात व्हॉटसअॅपवरुन पसरलेल्या माहितीवरुन अनेक हिंसेच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. या अॅप्लिकेशनमुळे अशा घटनांना आळा बसण्यास मदत होईल.