करोना महामारीमुळे आपण सर्वचजण घरात लॉकडाऊन झालो. ह्या लॉकडाऊनचे अनेक चांगले-वाईट परिणाम आपण गेल्या वर्षभराहून अधिक काळ सातत्याने पाहत आणि अभूवत आहोतच. तसाच या लॉकडाऊनमध्ये सर्वांना जवळपास एकसारखा आलेला अनुभव म्हणजे या दिवसांत बऱ्याच जणांचं वजन खूप जास्त प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळालं. परिणामी, अनेकांच्या मनावरचंही वजन वाढलं. वजन कमी करण्याचे खरंतर अनेक उपाय आणि पद्धती आपल्याला माहिती असतात. पण त्यातलं नेमकं आपल्याला पूर्णवेळ काय जमेल? आणि काय आवडेल? याबाबत आपल्याच मनात संभ्रम असतो. दरम्यान, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या २ तुम्हाला माहित असलेल्या गोष्टींव्यतिरिक्त आणखीही काही गोष्टी समजून घेणं आणि गैरसमज दूर करणं महत्त्वाचं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी नुकतंच आपल्या सोशल मीडियावर आपल्या शरीराच्या वजनाविषयी ३ फॅक्ट्स पोस्ट केल्या आहेत. ऋजुता दिवेकर एका व्हिडिओद्वारे आपल्या फॉलोअर्सना सांगत आहेत की, “अनेकदा आपल्यापैकी बरेच जण शरीराचं वजन आणि शरीरातील चरबीच्या प्रमाणाला (जाड किंवा बारीक दिसण्याला) फिटनेस मोजण्याचं परिमाण समजू लागतो. मात्र, हे चुकीचं आहे.” हेच सांगताना पुढे ऋजुता दिवेकर यांनी शरीराच्या वजनाबद्दल ३ महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा केला आहे.

शरीराचं वजन म्हणजे नेमकं काय?

एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या वजनाकडे बऱ्याचदा त्यांच्या फिटनेसचं परिमाण म्हणून पाहिलं जातं. बरेच जणांचा यामुळे गोंधळ उडतो, गैरसमज असतो. यावर ऋजुता दिवेकर म्हणतात की, जर तुमच्या वजनाचा आकडा खाली येत नसेल तर तुम्ही बिलकुल निराश होऊ नका. कारण शरीराच्या रचनेतील बदल हे पूर्णपणे शरीराच्या वजनावर अवलंबून नसतात. शरीराचं वजन म्हणजे त्यात आपल्या स्नायूंचं वजन, चरबी, हाडं आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण या सगळ्याचा समावेश असतो. म्हणूनच, तुमचं वजन हे तुमच्या फिटनेसचं अचूक चित्र असू शकत नाही.

तुमचं वजन दिवस आणि वयानुसार बदलतं

शरीराच्या वजनामध्ये एका दिवसात काही ग्रॅम किंवा अगदी किलोग्रॅमपर्यंतचा चढ-उतार होणं पूर्णपणे सामान्य आहे. हा चढउतार तुमच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण बदलल्यामुळे तसेच सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कोणत्या द्रवपदार्थांचा समावेश केला ह्यावर अवलंबून असतो. त्याचसोबत आणखी काही घटकांमुळे देखील तुमच्या वजनात चढ-उतार होऊ शकतात. उदा. घाम येणं, श्वसन, लघवी, खाण्याची वेळ आणि आतड्यांच्या हालचाली इ. आणखी एक मुद्दा म्हणजे सकाळी आपल्या शरीराचं वजन रात्रीच्या वेळेपेक्षा थोडं कमी असतं.

वजन कितीही असलं तरी…

न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर या मुद्द्यावर अधिक भर देतात कि, कोणीही तंदुरुस्त आणि निरोगी असू शकतो, मग त्यांच्या शरीराचं वजन कितीही असो. महत्त्वाचं हे आहे कि, तुमची शारीरिक हालचाल आवश्यक त्या प्रमाणात असावी आणि दिवसभर तुमची ऊर्जा पातळी पुरेशी असावी. शरीराच्या वजनाची चिंता न करता दररोज नियमित व्यायामासह निरोगी आणि संतुलित आहार घ्यावा. जो तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करू शकतो.

एक लक्षात घ्या कि, तुमच्या शरीराच्या वजनात काही प्रमाणातील चढउतार सामान्य आहे. मात्र, जर ह्याचं प्रमाण खूप जास्त असल्याचं तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nutritionist rujuta diwekar 3 facts about weight loss gst