आपल्याला बऱ्याचदा झटपट होणारे काही तरी हवे असते. पण झटपट करण्याच्या नादात त्यातली पोषणमूल्ये मात्र आपण हरवून बसतो. ही पाककृती नेहमी घाईत असणाऱ्यांसाठी खास. हिचे वैशिष्टय़ म्हणजे ही जरी झटपट होणारी असली तरी पोषणमूल्येही त्यात भरपूर आहेत. याला ओट्स इन जार असे म्हणतात.
साहित्य
काचेची बऱ्यापैकी आकाराची आणि मोठय़ा तोंडाची बरणी, रोल्ड ओट्स, दूध (याला पर्याय म्हणून नारळाचे दूध किंवा बदामाचे दूधही घेता येईल.), खजूर, अक्रोड, सुके अंजीर किंवा ताजी फळे कापून. आवडीनुसार मध अथवा साखर.
कृती
रात्री कामधाम आवरल्यावर काचेची ही बाटली घ्यावी. ती स्वच्छ पुसून त्यात अध्र्यापर्यंत ओट्स आणि वरचा अर्धा भाग दूध घालून फ्रिजमध्ये ठेवावी. सकाळी बाहेर काढायची. त्यात मध किंवा साखर घालायची. आवडतील त्याप्रमाणे सुका मेवा नाही तर ताजी फळे घालायची. वेळ असेल तर ताज्या फळांचे तुकडे वगैरे करायचे. नाही तर सुका मेवा झिंदाबाद. हे मिश्रण चवीला झक्कास लागते. झटपट नाश्ता तयार झाला.