Jaswandi Plant Marathi Gardening Hacks: श्रीगणेशाचं आवडतं फुल म्हणजे जास्वंद. घरी बाप्पाची पूजा करताना आपल्या बागेत फुललेलं एखादं तरी फुल चरणावर वाहावं अशी अनेकांची इच्छा असते. याच इच्छेपोटी आपण बाजारातून जास्वंदाच्या फुलांची रोपं आणता, त्याला वेळोवेळी सूर्यप्रकाश व पाणी देऊन त्याची निगा सुद्धा राखता, रोप तुम्ही लावलेल्या लहानश्या कुंडीत बहरत जातं, त्याला अगदी टवटवीत पाने येतात पण कळ्या? कळ्या मात्र काही केल्या येतच नाहीत, अशावेळी काय करावं हे आज आपण पाहणार आहोत. जास्वंदाच्या रोपाला वेगवेगळ्या पद्धतीची खते देणे खूप आवश्यक असते यासाठी बाजारातून महाग सेंद्रिय खत किंवा केमिकल्स आणायची गरज नाही पण किचनमधील काही वस्तू वापरूनही काम पूर्ण करता येतं. आज आपण टाकाऊ कांद्याच्या सालीचा वापर करून खत कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला एक मॅजिकल घटक सुद्धा जोडायचा आहे, तो काय आणि खताचा वापर नेमका कसा करावा हे पाहूया..
एस पी गार्डनिंग मराठी या युट्युब चॅनेलवर जास्वंदाच्या रोपाला भरपूर कळ्या येण्यासाठी कांद्याच्या सालीचा वापर कसा करावा याची माहिती देण्यात आली आहे. या व्हिडीओनुसार आपल्याला कांदा सोलल्यावर साले फेकून न देता एका भांड्यात जमा करायची आहेत. या साली आपण प्रमाणानुसार पाण्यात भिजवून ठेवायच्या आहेत. १ ते २ दिवस या साली भिजवून घेतल्यावर त्यातील अर्क पाण्यात उतरलेला असतो. कांद्याच्या साली या फॉस्फरस व सल्फरयुक्त असल्याने त्या रोपाच्या वाढीसह त्याला जंतू व कीटकांपासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतात.
तुम्ही कांद्याच्या सालीचा अर्क असलेले पाणी तयार झाले की एका मऊ कपड्याने किंवा गाळणीने गाळून घ्यावे. या पाण्याला जसेच्या तसे वापरून चालणार नाही आपल्याला याला थोडं सौम्य करावं लागेल. त्यासाठी दोन तांबे पाण्यात एक तांब्या कांद्याच्या सालीचं पाणी असं मिश्रण तयार करा. आपण यामध्ये अगदी शक्य असल्यास लाकडाची राख सुद्धा मिसळावी. याची कळ्या येण्यास खूप मदत होते. आणि मग हे पाणी आपल्याला जास्वंदाच्या रोपाच्या कुंडीत घालायचे आहे.
जास्वंदाच्या रोपाची काय काळजी घ्यावी?
जास्वंदाच्या कुंडीत पाणी घालताना माती ही मोकळी आणि कोरडी असेल असे बघा कारण जर माती अगोदरच ओलसर किंवा चिकट असेल तर खताचे पाणी नीट शोषले जाणार नाही.
जास्वंदाच्या कळ्या भरपूर याव्यात यासाठी अधून मधून रोपाला ट्रिम करत राहावे म्हणजे काय, तर वाढत जाणाऱ्या जुन्या फांद्या कापून त्या जागी नवी पालवी येऊ द्यावी, ज्याला कळ्या येण्याची शक्यता जास्त असते.
हे ही वाचा<< डोक्याचा पूर्ण उपयोग! मैद्याच्या ब्रेडशिवाय बनवलं डोश्याचं क्लब सँडविच, तुम्हाला प्रयोग कसा वाटतोय बघा
जास्वंदाला पाणी देताना सुद्धा प्रमाणात पाणी द्यावे. सतत कुंडीत चिखल करून ठेवल्याने रोपाची वाढ होते असा समज करून घेऊ नये, यामुळे उलट बुरशी लागण्याचा धोका असतो.
जास्वंदाला अगदी कडक उन्हात ठेवू नये.