मानसिक वेदना घालविण्यासाठी किंवा झोप येण्यासाठी अनेक जण ओपिऑइड या औषधाचा उपयोग करतात. मात्र हे औषध मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त नाही. दीर्घकाळ ओपिऑइड औषधाचे सेवन केल्याने नैराश्यात वाढ होते, असा दावा अमेरिकेतील वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे.
ओपिऑइड या औषधाचा वापर मन:स्थिती बदलण्यासाठी उपयुक्त ठरतो. पण संशोधनानुसार या औषधांचा ३० दिवसांपेक्षा अधिक काळ केलेला वापर हा नैराश्याला आमंत्रण देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ओपिऑइडमुळे चेतासंस्थातील आणि टेस्टोस्टिरेवनमधील (वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्टय़ांचे वाढ संप्रेरक) होणाऱ्या बदलासोबतच संभाव्य जैविक बदलांवरून केला गेला आहे. या वेळी दु:ख आणि नैराश्य यांच्यातील परस्परविरोधी संबंधांवर लक्ष केंद्रित करताना अभ्यासादरम्यान आरोग्यतज्ज्ञांकडून ओपिऑइड औषधांचे सेवन केल्याने रुग्णांत नैराश्याची भर पडत असल्याचे दिसून आले.
ओपिऑइडसंदर्भात केलेला दावा हा दीर्घकालीन सेवनामुळे सुरू होणाऱ्या नैराश्यांशी संबंधित असून औषधाची मात्रा म्हणून त्याचा वापर करण्याला हरकत नाही, असे अमेरिकेच्या सेंट ल्युइस विद्यापीठातील प्राध्यापक जेफरी सॅकरर यांनी व्यक्त केले आहे. वेदनाशामक ओपिऑइड औषधांचा ३० दिवस सतत केलेला वापर हा नैराश्याला कारणीभूत ठरू शकतो. याविषयी रुग्ण आणि डॉक्टरांनीही सजग राहण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.
संशोधकांनी २००० पासून २०१२ पर्यंत विविध वैद्यकीय संस्थांकडून माहिती संकलित केली. यापैकी १८ ते ८० वयोगटातील अनेकांनी कोणत्याही प्रकारचे नैराश्य नसतानाही ओपिऑइड औषधांचे सेवन करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. मात्र दीर्घकाळ हे औषध सेवन केल्याने त्यांच्या नैराश्यात वाढ झाल्याचे दिसून आले. हे संशोधन ‘जर्नल अ‍ॅन्नल्स ऑफ फॅमिली मेडिसिन’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा