रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते, कारण ऐनवेळी रुग्णासाठी जुळणाऱ्या गटाचे रक्त मिळवण्यासाठी किती धावपळ करावी लागते हे ज्यांच्यावर तो प्रसंग आलेला असतो त्यांनाच माहीत असते. आता वैज्ञानिकांनी रक्ताला कृत्रिम पर्याय शोधून काढला असून तो पदार्थ म्हणजे सागरी किडय़ांपासून काढलेले एक प्रथिन आहे. आपल्या रक्तात हिमोग्लोबिनमार्फत ऑक्सिजन वाहून नेला जातो. नवीन शोधण्यात आलेले हिमरायथ्रिन हे प्रथिन कृत्रिम हिमोग्लोबिनवर आधारित घटकांसारखे नाही हा त्याचा वेगळेपणा आहे.
बेबीज-बोलाय विद्यापीठाचे प्रा. राधू सिलांघी -डय़ुम्रिटेस्कू यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांनी रक्ताला पर्याय ठरत असलेल्या पदार्थाची चाचणी उंदीर व काही संस्कारित पेशींवर केली आहे. प्राथमिक निष्कर्षांनुसार पेरफ्लुरोकार्बन किंवा हिमोग्लोबिनवर आधारित असलेल्या ऑक्सिजनवाहक, पण कृत्रिम घटक पदार्थापेक्षाही ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य या नव्या पदार्थामुळे चांगल्या पद्धतीने केले जाते.
मानवी रक्त हे जरी आपण रक्तदान झाल्यानंतर साठवून ठेवत असलो तरी ते काही आठवडेच टिकते व नंतर वापरण्यास निरुपयोगी ठरते. रक्तगट जुळवणे हे एक महत्त्वाचे काम त्यात करावे लागते. शिवाय दूषित रक्तामुळे एड्ससारख्या रोगांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळेच रक्तदान केलेल्या रक्ताची चाचणी करून नंतरच ते वापरणे अपेक्षित आहे, पण यातही एक धोका असतो दात्याला नुकताच एचआयव्हीग्रस्त किंवा एखाद्या जिवाणू किंवा विषाणूने ग्रस्त झाला असेल तर काही वेळा हे धोके रक्ततपासणीतही कळतात असे नाही. त्यामुळे रक्ताला पर्याय निर्माण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत असे मेडिकल एक्सप्रेसने म्हटले आहे. वैज्ञानिकांनी रक्ताला पर्याय म्हणून जो पदार्थ वापरलेला आहे तो हिमोग्लोबिनपेक्षा वेगळय़ा अशा हेमेरायथ्रिनवर आधारित आहे. त्यात हिमोग्लोबिनपेक्षाही मुक्तकणांचा (फ्री रॅडिकल्स) धोका कमी होतो. मानवी ल्युकोसाइटस व मानवी नाळेच्या पेशींवर त्याचे परिणाम तपासण्यात आले आहेत. प्रमाणित ग्लुटाराल्डेहाइड या गायीमधील बहुलकीकरण केलेल्या हिमोग्लोबिनशीही या पदार्थाची तुलना करण्यात आली असता तो आरोग्यदायी असल्याचे दिसून आले आहे.
संशोधकांनी सांगितले, की रक्ताला कायमचा पर्याय शोधणे हा आमचा हेतू नाही, तर अगदी जोखमीच्या परिस्थितीत काही तासांसाठी रुग्णाला जिवंत ठेवता यायला हवे, रक्त उपलब्ध नाही म्हणून लगेच त्याचे मरण ओढवले जाऊ नये, भले नंतर रक्त मिळाले तरी चालेल यासाठी आम्ही हे संशोधन करीत आहोत.
हेमेरायथ्रिनचा नवा पर्याय
हेमेरायथ्रिन हा पदार्थ हा खरेतर हेम रेणू नाही. तो खरेतर रंगहीन ऑक्सिजनरहित आहे, पण तो जेव्हा ऑक्सिजनला चिकटतो तेव्हा त्याचा रंग जांभळट गुलाबी होतो. हेमेरायथ्रिन याचे अनेक विशिष्ट गुणधर्म सांगता येतात, पण त्यांचा संपूर्ण परिचयही आपल्याला झालेला नाही. त्याचे सकारात्मक गुण पाहिले तर तो कार्बन मोनॉक्साईडशी फारशी जवळीक राखत नाही.

Story img Loader