‘जुने ते सोने’ या सत्याचा फॅशनविश्वात नेहमीच प्रत्यय येत असतो. व्यक्तिमत्त्व अधिक खुलविण्यासाठी परिधान केल्या जाणाऱ्या दागिन्यांच्या बाबतीत सध्या तोच नियम लागू आहे. प्राचीन काळातील काहीसे ओबडधोबड आणि रांगडे दागिने नव्याने वापरता येऊ लागले आहेत.
अगदी अनादी काळापासून माणसाला अलंकार म्हणजेच दागिन्यांची हौस आहे. प्राचीन लेण्यांमधील भित्तिचित्रे त्याचा पुरावा आहेत. मोहेंजोदारो आणि हडप्पा या हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीतील लोकही आपापली ऐपत आणि कुवतीप्रमाणे दागिन्यांचा शौक बाळगत होते. अलंकृत होणे म्हणजे सौंदर्य खुलवणे, त्यात भर घालणे ही पद्धत पूर्वापार प्रचलित आहे. दागिने हे सौंदर्याचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. काळानुरूप दागिन्यांचे प्रकार, रचना यात फरक झाला इतकेच. ठरावीक काळानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. फॅशनच्या बाबतीतही हा नियम लागू पडतो. त्यामुळेच सत्तरच्या दशकातील बेलबॉटम पॅन्ट पुन्हा २१ व्या शतकात आवडीने घातली जाते. एरवी साडीला नाके मुरडणाऱ्या तरुणी सणासुदीला अथवा विशेष प्रसंगी नऊवारी साडी घालणे पसंत करतात. दागिन्यांच्या बाबतीतही तेच झाले आहे. अॅन्टिक म्हणून केवळ शोभेपुरते मर्यादित असलेले प्राचीन पद्धतीचे दागिने आता नव्याने फॅशन म्हणून वापरात येऊ लागले आहेत. दागिने म्हणजे चकचकाट, झगमगाट ही आतापर्यंत रूढ असणारी संकल्पना आता मागे पडून पुन्हा प्राचीन पद्धतीचे दागिने घातले जाऊ लागले आहेत. सध्या प्रचलित असलेल्या पद्धतीला छेद देत काळवंडलेल्या चांदीचे (ऑक्सिडाइज् केलेले) ओबडधोबड नक्षीकाम असलेल्या दागिन्यांना महिला पसंती देऊ लागल्या आहेत. या दागिन्यांमधले मार्दव, वैभव, खानदानीपणा महिलांना आवडू लागला आहे. त्यातूनच अधिकाधिक प्राचीन पद्धतीच्या अलंकारांची निवड होऊ लागली आहे.
पूर्वी भारतात वजनदार दागिने वापरले जायचे. मात्र आता तो ट्रेण्ड मागे पडला असून, वजनाला हलके परंतु ठसठशीत दिसतील अशा दागिन्यांना पसंती दिली जाते. दोन दशकांपूर्वी जुने दागिने लोप पावतील की काय, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून पुन्हा मागणी वाढल्याने आता मोठय़ा प्रमाणात जुन्या पद्धतीने दागिने घडविले जाऊ लागले आहेत. चित्रपट आणि फॅशन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चित्रपटांमधून दिसणारी फॅशन समाजाकडून स्वीकारली जाते. तसेच समाजात दिसणारी फॅशन चित्रपटांमधून दाखवली जाते. अलीकडच्या काळातील काही नव्या चित्रपटांमधील नायिकांच्या कॉस्च्युममध्ये अगदी ठसठशीतपणे जुन्या पद्धतीच्या दागिन्यांचा वापर केलेला दिसून येतो. त्यातूनच हे लोण तरुणींपर्यंत पोहोचले आहे.
भारतातील राजस्थान, गुजरातसारख्या राज्यांना दागिन्यांचा मोठा वारसा आहे. तेथील दागिन्यांचे प्रकार, त्यांची घडण, नक्षी अतिशय मनमोहक आहे. आता त्या पारंपरिक दागिन्यांमध्ये काही बदल करून त्यांना आधुनिकतेची जोड देण्यात आली. राजस्थानमध्ये बहुतेक चांदीचे दागिने वापरले जातात. चांदी हा धातू ऑक्सिजनच्या संपर्कात आला की कालांतराने काळवंडतो. या काळवंडलेल्या चांदीला फॅशनच्या जगतात ‘ऑक्साइड’ असे म्हटले जाते. चकचकीत दागिने वापरण्याऐवजी चांदीचे काहीसे काळपट आणि रांगडे दागिने वापरण्याचा ट्रेण्ड सध्या इन आहे. ऑफिसला जाताना रोजच्या कॉर्पोरेट लुकचा कंटाळा येतो. अशा वेळी एखादा कॉटनचा कुर्ता-लेगीन्स घालून जाणे मुली पसंत करतात. मात्र त्यावर ज्वेलरी निवडताना एखादं कानातलं किंवा नेकपीस घालण्याकडे त्यांचा कल असतो. सध्या बाजारात आपल्याला मोठय़ा प्रमाणात ऑक्साइड ज्वेलरी दिसून येते. ‘आम्रपाली’सारख्या बडय़ा बॅ्रण्डनी ऑक्साइड ज्वेलरीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले असून स्ट्रीट मार्केटनेही या दागिन्यांना महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे.
आधुनिक चमकी!
नोज पीन म्हटलं की, एखादा लहानसा खडा किंवा रिंग डोळ्यासमोर येते. सध्या बाजारात शिक्क्यांच्या आकाराच्या नोज पीन्स्ची चलती आहे. अनेक बॉलीवूड नायिकांनीही अशा प्रकारच्या नोजपिन्स्ना पसंती दिली आहे. या पिन्स्चे वैशिष्टय़ म्हणजे हे वेस्टर्न कपडय़ांवरही उठून दिसतात. त्यामुळे छान इंडो-वेस्टर्न लुक येतो. एकूण ही आधुनिक चमकीच!
नेकपीस.
ऑक्साइडमध्ये आपल्याला भरीव असे मोठमोठाले नेकपीस पाहायला मिळतात. पारंपरिक कपडय़ांवर अशा प्रकारचे नेकपीस परिधान केल्यास दुसऱ्या कोणत्याही दागिन्यांची गरज भासत नाही. तसेच ऑफिसला जाताना जर तुम्हाला हेवी ज्वेलरी नको असेल तर ऑक्साइड ज्वेलरीमध्ये सिंगल पेंडन्टच्या चैनचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. तसेच ऑक्साइड नेकपीसमध्ये सध्या कानातले आणि नेकलेस असा सेटही उपलब्ध आहे.
बांगडय़ा..
बॉलीवूडमधील नायक-नायिकांनी केलेली स्टाईल ट्रेण्ड बनते. काही वर्षांपूर्वी ‘ताल’सारख्या चित्रपटांमधून ऑक्साइडच्या बांगडय़ांची स्टाईल आली, ती आताही प्रचलित आहे. अत्यंत बारीक आकारच्या दोन ते तीन डझन बांगडय़ा एकाच हातात घालणे मुली पसंत करत. सध्या पझल स्टाईल बँग्लस किंवा चार वेगळ्या आकारांच्या बांगडय़ांचा सेट घालणे तरुणी पसंत करतात. या बांगडय़ा साधारण पन्नास रुपयांपासून बाजारात उपलब्ध आहेत.
अँकलेट
साधारणपणे पारंपरिक अँकलेटला तरुणी पसंती देतात. मात्र फॅशनविश्वाचे वैशिष्टय़ हे की, त्यात कोणतीही एकच गोष्ट फार काळ चालत नाही. त्यात बदल अपरिहार्य असतोच. अँकलेटबाबतही काहीसे तसेच झाले आहे. हल्ली केवळ एकाच पायामध्ये अँकलेट घालण्याचा ट्रेण्ड आहे. सध्या तरुणी राजस्थानच्या पारंपरिक अशा पायातील कडय़ांना पसंती देत आहेत.
ऑक्साइड कर्णभूषणे
सध्या बाजारात अनेक प्रकारचे झुमके पाहायला मिळतात. चांदीचा मुलामा देऊन ऑक्सिडाइज् केलेल्या झुमक्यांची फॅशन सध्या इन आहे. हे झुमके कोणत्याही रंगाच्या कपडय़ांवर शोभून दिसतात. हँगिंग झुमक्यांचे हजारो प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. झुमका म्हटलं की पूर्वी फक्त वर्तुळाकार झुंबर होते. आता काळानुरूप झुंबरांचा आकार बदलत गेला. आता बाजारामध्ये त्रिकोणी, चौकोनी आकाराचे झुंबर असलेले झुमके उपलब्ध आहेत. त्यावर पारंपरिक नक्षीकाम केलेले दिसून येते. तसेच चांदबाली, फुलांच्या आकाराचे ऑक्साइडचे टॉप्सही सध्या बाजारात उपलब्ध आहेत.
कुठे मिळतील.?
मुंबईमध्ये कुलाबा कॉजवे, भुलेश्वर, बांद्रा हिल रोड, लिंकिंग रोड, मालाड नटराज मार्केट इथे स्लीव्हर दागिने मिळतील.