पर्यटन
माधवी सोमण – response.lokprabha@expressindia.com
त्या बेचक्यात मला डोळे लुकलुकताना दिसले. मी बघतच बसले. कारण आजपर्यंत इतकं निरागस मी काहीच पाहिलं नव्हतं. छोटासा पक्षी तो. त्याचे डोळे सोडले तर बाकी अंग झाडाच्या खोडाशी मिळतंजुळतं.
‘ताडोबा’ ही माझी पहिली जंगल सफारी. ताडोबाला जाऊन आले आणि मला व्यसनच लागलं जंगल फिरायचं.
पण माझ्या सफारीची सुरुवात जरा मजेशीरच झाली. सांगताना लाज वाटते आहे. पण मी सांगणारे. कारण अशा अनुभवातूनच तर आपण शिकत असतो. ताडोबात शिरलो तेव्हा जिप्सीत भन्नाट वारं अंगावर येत होतं. खूप मज्जा वाटत होती. आमच्या पुढे पाच जिप्सी होत्या. सगळ्या एका रांगेत चालल्या होत्या आणि अचानक आमच्या ड्रायव्हरदादांनी गाडी उजवीकडे वळवली आणि डांबरी रस्ता सुटून सुरूझाला, मातीचा खडबडीत रस्ता. जेमतेम एक जिप्सी जाईल असा. दुतर्फा घनदाट झाडी. फांद्या जिप्सीत येऊन आमच्या खोडय़ा काढायला लागल्या. कुठे हातावर ओरखडा ओढ तर कुठे कानात गुदगुल्या कर. पण जंगलाचा हा स्पर्श आवडत होता आम्हाला. त्यामुळे आमच्यातलं आणि जंगलातलं अंतर कमी होत चालल होतं. जंगलाशी आमची मत्री व्हायला लागली होती. विनोददादा आमचे ग्रुप लीडर होते..
विनोददादा आम्हाला छोटय़ा छोटय़ा पण महत्त्वाच्या सूचना देत होते. जंगलात तोंड बंद आणि कान, डोळे उघडे ठेवा. जंगलातले आवाज टिपा. दुतर्फा असलेल्या घनदाट झाडीत लक्ष ठेवा. कारण जंगलात कधी काय दिसेल सांगता येत नाही. आम्हीही त्यांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करत होतो. काही शंका आलीच तर अगदी हळू आवाजात विचारत होतो.
आणि अचानक डाव्या वळणावर एका झाडाखाली गाडी थांबली.. म्हणजे नक्कीच काही तरी दिसलं होत गाईडदादांना. पण काय ? आम्हाला तर आजूबाजूला काहीच दिसेना.. मग आम्हीही उत्सुकतेनं शोधायला लागलो.. इतक्यात गाईडदादा आपल्याच सीटवर उभे राहिले आणि म्हणाले, ‘समोरचं झाड आहे ना त्याला जिथे फांदी फुटली आहे त्याच्या बेचक्यात बघा. आऊल आहे. पिल्लू आहे.. आणि त्याच फांदीवर त्याची आई बसली आहे.’ आता सगळ्यांच्याच नजरा आऊल शोधायला लागल्या..अनिलदादा, विनोददादा आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून शोधत होते तर आरूजा बायनाक्युलरमधून. मी आणि ज्योतीही बघत होतो.. पण काही दिसत नव्हतं.. माझ्या डोळ्यांवर गॉगल तसाच होता, तो काढावा का या विचारातच होते. इतक्यात विनोददादांनी हळू आवाजात विचारलं,‘ आऊलला मराठीत काय म्हणतात ?’ प्रश्न खरं तर अनन्या-आरूजाला होता. पण नकळत मीच उत्तर दिलं, ‘घुबड.’
‘घुबड’ आणि गॉगलकडे गेलेला हात झरकन मागे आला. मी मटकन खाली बसले. डोळे गच्च बंद केले आणि पोहोचले कोकणात मालवणजवळच्या ‘आंबेरी’ या गावी. असेन त्यावेळी आठ-नऊ वर्षांची.. दिवसही मे महिन्यातलेच होते. सकाळची अकराची वेळ. माझे बाबा, काका आणि चुलत भावंडं गेली होती रातांबे (आमसुलाचं फळ) गोळा करायला. आई आणि काकू कंपनी स्वयंपाकघरात रांधत होत्या. आजोबा कुठेतरी बाहेर जायच्या तयारीत होते आणि आजी अंगणात रातांबे फोडत बसली होती. म्हणजे खरं तर ती माझ्यावर लक्ष ठेवायला बसली होती. कारण मी भोकाड पसरलं होतं ना.. मलाही जायचं होतं सगळ्यांबरोबर रातांबे गोळा करायला. पण तिने काही माझ्या हट्टाला दाद दिली नाही. कुठे काटा टोचला, िवचू चावला तर मी शेंडेफळ, सगळ्यात लहान, त्यामुळे तिचा माझ्यावर विशेष जीव. म्हणाली, ‘चल तू खेळ. मी बसते तुझ्याबरोबर.’
ती रातांबे संपले म्हणून आत ते आणायला गेली. बाहेर येऊन बघते तर मी अंगणात नाही. तशी घाबरली. मला शोधायला लागली. इतक्यात समोरच्या फणसाच्या झाडाखाली उभी असलेली मी तिला दिसले.
‘गो म्हशे काय करतेयस तिकडे.’
‘आजी हे बघ इथे काय आहे.’ मी उत्साहाने म्हणाले.
तशी माझ्या मागे येऊन उभी राहिली आणि मी झाडावर काय बघत आहे ते तिने पाहिलं मात्र पटकन माझ्या डोळ्यांवर हात ठेवून मला ओढतच घरात घेऊन आली.. तोंडाने काही तरी देवाचं पुटपुटत होती. मधेच अशुभ.. अशुभ असंही म्हणत होती. मी मात्र तिच्या हातातून सुटायचा प्रयत्न करत होते. ‘बघू दे ना गं मला आजी’ असा आरडाओरडा करत होते. माझा आवाज ऐकून स्वंयपाकघरातल्या गृहिणी बाहेर आल्या. आई काही विचारणार इतक्यात आजी म्हणाली, ‘काही झालं नाही आहे तुझ्या लेकीला, चला स्वंयपाकाला लागा.’ तशा आलेल्या त्या परत स्वंयपाकघरात गेल्या. आजोबा झोपाळ्यावर बसून शांतपणे हातात घडय़ाळ घालत होते. त्यांना बघून आजी म्हणाली, ‘तुम्हीही लगेच बाहेर पडू नका. वाटेतल्या झाडावरच ‘ते’ बसलं आहे. दहा मिनिटांनी बाहेर पडा.’
‘ठिक आहे. माझ्यासाठी पाणी आणतेस?’ आजोबा.
‘आणते, पण या कार्टीकडे लक्ष ठेवा. नाही तर जाईल दार उघडून बाहेर.’ असं म्हणत आजी पाणी आणायला गेली.
तसं आजोबांनी शांतपणे दार उघडलं आणि ते निघणार इतक्यात मी विचारलं, ‘आजोबा काय आहे ते?’
माझ्या डोक्यावरून हात फिरवत आजोबा छानसं हसत म्हणाले, ‘घुबड.’
‘पण त्याला पाहिलं तर काय होतं? आजी अशी घाबरली का..? आणि अशुभ म्हणजे काय.?’
‘अशुभ म्हणजे वाईट गोष्ट. घुबडाला पाहिलं की काही तरी वाईट घडतं अशी आपल्याकडे अंधश्रद्धा आहे..’
‘अंधश्रद्धा’ म्हणजे काय.?’
‘तू मोठी झालीस की कळेल तुला.’ असं म्हणून ते घराबाहेर पडले.
मीही निघाले होते त्यांच्यामागे, पण माझे पाय दारातच थांबले. बहुतेक त्या अंधश्रद्धेने मनात जागा मिळवली होती.
आणि आज खात्री पटली ‘बहुतेक’ नाही तर ‘पक्कीच’ जागा मिळवली होती. कारण आज २५ वर्षांनंतरही घुबड दिसताच तोंड फिरवलं होतं मी..
इतक्यात कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवून मला गदागदा हलवलं आणि मी भानावर आले.
‘काय गं बघितलंस का घुबड..?’ ज्योती विचारत होती आणि सगळेजण माझ्याकडे टकामका बघत होते.
मी जाम गोंधळले होते. काय सांगावं तेच सुचेना.
तसं विनोददादा म्हणाले, बघून घ्या लवकर. आपल्याला पुढे जायचंय, अजून खूप काही बघायचंय’
आता काय करावं.. ‘ते’ बघितलं आणि काही अशुभ घडलं तर.. जंगलात आहोत, वाघाने हल्ला केला तर.. आमच्या जिप्सीतलं पेट्रोल संपून जंगलातच राहायची वेळ आली तर किंवा सहा सफारीत एकही वाघ दिसला नाही तर? एक ना दोन. नाही नाही ते विचार येत होते मनात..
‘अहो कसला विचार करताय एवढा?’ विनोददादा
‘नाही काही नाही डोळ्यांत काही तरी गेलं होतं.’
‘मग निघालं का? बघू.’ जरा काळजीतच ज्योतीने विचारलं.
‘हो अगं निघालं. मी ठीक आहे आता.’ मी.
‘माधवीमावशी अगं बघ ना किती छान पक्षी आहे. आमच्या सगळ्यांचा झाला बघून. भरपूर फोटो काढले.’ अनन्या म्हणाली.
आणि माझी टय़ूब पेटली..अरे या सगळ्यांनी बघितलं ‘ते’, मग आता मी एकटीने न पाहून असं काय शुभ घडणारे. मला तर यांच्या बरोबरच सफारी करायची ना..?’
चला माधवीताई घ्या दर्शन त्याचं.. असं मनातच म्हणत मी उत्साहाने पुढे झाले आणि बघायला लागले. पण मला काही ते दिसेना.
‘नाही दिसत आहे.’ मी.
माझ्याकडे बघत विनोददादा म्हणाले, ‘तो गॉगल काढा आधी डोळ्यावरचा. म्हणजे नीट दिसेल.’
‘हो.. हो.’ असं म्हणत मी गॉगल काढला आणि पुन्हा बघायचा प्रयत्न केला पण मला काही दिसेच ना.
मी मानेनेच नकार दिला तसं सगळेच मला घुबड दाखवायचा प्रयत्न करायला लागले. त्यामुळे मी आणखीनच गोंधळून गेले.
मग विनोददादांनी सूत्रं आपल्या हातात घेऊन सगळ्यांना शांत केलं आणि मला म्हणाले, ‘तुम्ही असं करा, झाडाच्या मुळापासून हळूहळू नजर वर नेत जा आणि जिथे दुसरी फांदी फुटली आहे तिथेच नजर स्थिर करा. बघा दिसेल.’
त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी केले आणि बरोबर त्या बेचक्यात मला डोळे लुकलुकताना दिसले. मी बघतच बसले. कारण आजपर्यंत इतकं निरागस मी काहीच पाहिलं नव्हतं. छोटासा पक्षी तो. त्याचे डोळे सोडले तर बाकी अंग झाडाच्या खोडाशी मिळतंजुळतं. झाड कुठलं आणि पक्षी कुठला कळणं अवघड. एखादं लहान बाळ जसं नवीन माणसाकडे भांबावल्यासारखं बघत असतं तसं ते आमच्याकडे बघत होतं. इतर पक्ष्यांपेक्षा किती वेगळा होता हा पक्षी. त्याचा आकार, त्याचे एकदम हटके गोल गरगरीत मोठे डोळे.
‘दिसलं का?’ विनोददादा.
‘हो..किती गोड आहे.’ मी सहज म्हणून गेले.
‘आता त्याच फांदीवर पाहात जा..’
बघते तर एक मोठं घुबड बसलं होतं त्या फांदीवर. अगदी त्या छोटय़ा पिल्लासारखंच पण आकाराने त्याच्या तिप्पट होतं ते. ती त्याची आई होती. अतिशय सावध होती ती आणि आमच्यापासून तिच्या पिल्लाला काही धोका नाही ना याचा अंदाज घेत होती.
पण वळून वळून माझी नजर त्या पिल्लावर स्थिरावत होती. त्याच्याकडे बघताना २५ वर्षांपूर्वी पाहिलेला तो पक्षी आठवायचा प्रयत्न करत होते मी त्याच्याशी काही मिळतंजुळतं मिळत आहे का ते बघत होते. आणि एक गोष्ट सापडली. त्यावेळीही बघताना मला ते अशुभ वाटलं नव्हतं आणि आजही वाटत नव्हतं..
मी स्वत:शीच बोलले, ‘हे अशुभ असलं तर जगात शुभ काहीच नाही..निसर्गाने निर्माण केलेल्या या सुंदर गोष्टींचा आनंद न घेऊ शकणारे आपण ‘अशुभ’आहोत.’
‘निघायचं का?’ विनोददादा
‘हो हो.’ मी होकार देताच आमची गाडी निघाली..
तसं त्याच झाडाच्या मुळाशी आम्हाला आणखी एक पिल्लू पडलेलं दिसलं. आम्ही गाईडदादांना ते दाखवलं पण ते म्हणाले की जंगलात असताना जिप्सीतून खाली उतरायचं नाही आणि जंगलातल्या कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही असा नियम आहे. शिवाय त्याची आई आहे त्याच्याकडे बघायला. तुम्ही नका काळजी करू.
मग काय आम्हीही माना वळवल्या आणि पुढचा मार्ग धरला.
राहून राहून मला स्वत:च्या वेडेपणाचं हसू येत होतं..आणि अचानक एक गोष्ट लक्षात आली माझ्या. बाहेर घुबड आहे हे माहीत असूनही आजोबा निघून गेले होते. त्यांना काहीच फरक पडला नव्हता. पण मी मात्र लक्षात ठेवली ती आजीने घातलेली भीती. तिचा तरी काय दोष म्हणा! तिच्या आईने, सासूने जे शिकवलं तेच ती पुढच्या पिढीला शिकवत होती.
असो तर सांगायचा मुद्दा हा सफारीची सुरुवात घुबड पाहून झाली असली तरी खूप पक्षी-प्राणी बघितले. वाघही बघितला चांगला दोनदा. आमच्या सहा सफारी उत्तम झाल्या.
तेव्हापासून ठरवलं, जंगल सफारीत वाघ दिसला तर लक आपलं आणि नाही दिसला तरी बॅडलक आपलंच. उगाच आपल्या चांगल्या-वाईटाची जबाबदारी त्या बिचाऱ्या प्राणी पक्ष्यांवर का ढकला? ती आपली आपणच घेऊ या ना…
सौजन्य – लोकप्रभा