अ‍ॅस्पिरिन आणि आयबुप्रोफेन यांसारख्या साधारण औषधांच्या नियमित वापराने डोके आणि मानेचा कर्करोग झालेल्या रुग्णांचा जगण्याचा कालावधी लक्षणीयरीत्या वाढू शकतो, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठीतील (सॅन फ्रान्सिस्को) संशोधकांनी याबाबत अभ्यास केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘पीआयके३सीए’ म्हणून ओळखले जाणारे विशिष्ट बदल झालेले जनूक ज्या कर्करोगामध्ये आढळते, त्या रुग्णांमध्ये स्टेरॉइडविरहित वेदनाशामकांच्या (एनएसएआयडी) वापरामुळे एकूण पाच वर्षांच्या कालावधीत रुग्ण जगण्याचे प्रमाण (सव्‍‌र्हायव्‍‌र्हल रेट) २५ टक्क्यांवरून ७८ टक्के इतके वाढल्याचे दिसून आले. ज्या रुग्णांच्या कर्कगाठीमध्ये जनुकात बदल झालेला नाही, त्यांच्या जिवंत राहण्याच्या प्रमाणावर या औषधांचा कोणताही परिणाम जाणवला नाही.

डोके आणि मानेचा कर्करोग झालेल्या ज्या रुग्णांच्या ‘पीआयके३सीए’ जनुकात बदल (म्युटेशन) झाला आहे, त्यांना स्टेरॉइडविरहित वेदनाशामके (एनएसएआयडी) नियमित दिल्याचा उत्तम फायदा होतो, हे दाखविणारा हा पहिलाच अभ्यास असल्याचा या संशोधकांचा दावा आहे. यातून काही विशिष्ट आजारांमध्ये स्टेरॉइडविरहित वेदनाशामकांचा (एनएसएआयडी) वापर करण्यासाठी एक सबळ शास्त्रीय कारण मिळू शकते, असेही त्यांचे म्हणणे आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या प्राध्यापक जेनिफर आर. ग्रॅन्डिस यांनी याबाबत सांगितले की, स्टेरॉइडविरहित वेदनाशामकांच्या वापरामुळे केवळ डोके आणि मानेच्या कर्करोगातच नाही, तर ‘पीआयके३सीए’ जनुकात बदल होणाऱ्या इतर प्रकारच्या कर्करोगांतही सुधारणा घडवून आणण्यासाठी मदत होते, असे आम्हाला मिळालेले निष्कर्ष सांगतात. या प्रयोगाते दृश्य लाभ अत्यंत ठळक असून त्याचा मानवी उपचारांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader