आपण सुंदर दिसावं असं कोणत्या स्त्रिला वाटत नाही. म्हणूनच डागविरहीत, नितळ आणि तजेलदार त्वच्या प्राप्त करण्याचा तिचा प्रयत्न असतो. बाजारात अनेक सौंदर्यप्रसाधने उपलब्ध असल्याने त्यांच्या वापराकडे तिचा जास्त कल असतो. परंतु यातील अनेक सौंदर्यप्रसाधने ही ग्राहकांची दिशाभुल करणारी असतात. अपेक्षित परिणाम साधण्यात असमर्थ ठरणाऱ्या या सौंदर्यप्रसाधनांमधील केमिकल्समुळे त्वचेचे मात्र मोठं नुकसान होतं. म्हणूनच घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून पाहिलं तर फायदेशीर ठरू शकते. नैसर्गिकरित्या उजळ त्वचा मिळण्यासाठी पपई, काकडी, गुलाबपाणी यांच्या वापराने योग्य परिणाम मिळू शकतो. नैसर्गिक घटकांमुळे त्वचेला नुकसान पोहोचण्याची शक्यता कमी असते. आणि परिणामदेखील लवकर साधता येऊ शकतात.
पपई
– त्वचा कोरडी आणि सुरकुतलेली असेल, उन्हामुळे त्वचेवर पुटकुळ्या आल्या असतील तसेच त्यामुळे त्वचेची आग होत असेल तर पपईचा रस किंवा पिकलेल्या पपईची फोड त्वचेवर लावावी. यामुळे सुरकुत्या, दाह नाहीसा होऊन त्वचा नितळ आणि स्वच्छ होते. बाजारात मिळणाऱ्या रिंकल्स फ्री सौंदर्यप्रसाधनपेक्षा याने लवकर फरक जाणवतो.
– चेहऱ्यावर मुरमं येण्याचा त्रास अनेक महिलांना असतो अशावेळी कच्च्या पपईचा रस किंवा छोटीशी फोड करून ती चेहऱ्यावर लावावी.
– चेहऱ्याच्या सुंदरतेसाठीसुद्धा कच्च्या पपईचा रस तोंडावर चोळावा, यामुळे चेहऱ्यावर चकाकी येऊन सुरकुत्या नाहीशा होतात.
– वाढत्या वयामुळे त्वचाही निस्तेज बनू लागते अशावेळी अनेकजण ‘अँटी एजिंग क्रिम्स’चा सर्रास वापर चेहऱ्यावर करतात. पण, त्यापेक्षा पपई खाल्ल्यास फरक जाणवू लागतो, करण पपईमुळे रक्तशुद्ध होतं. पोट साफ असेल, पचनशक्ती चांगली असेल तर साहजिक बाह्यरुपही खुलून दिसतं.
काकडी
– उन्हामुळे चेहऱ्याबरोबर मानेकडचा भागही काळवंडतो तेव्हा तुम्ही पपईऐवजी काकडीचा वापरही त्वचा उजळवण्यासाठी करू शकता.
– काकडीचा कीस नियमितपणे चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील मुरुम, पुटकुळ्या, सुरुकुत्या दूर होऊन चेहरा उजळतो.
– पार्टीला जाण्यापूर्वी जर टवटवीत दिसायचं असेल तर काकडीचा रस आणि मध यांचे मिश्रण चेहऱ्यास हलक्या हाताने चोळून लावावे. फक्त हे मिश्रण आयब्रोला लागणार नाही याची काळजी घ्या, कारण मधामुळे त्या सोनेरी होण्याची शक्यता जास्त असते.
– डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी काकडी आणि बटाटे कुस्करून एकत्र करून डोळ्यांभोवती दररोज लावा. सुकल्यानंतर ते धुऊन टाकावं यामुळे काळी वर्तुळे लगेच निघून जातात.
– चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी काकडीचा रस, लिंबुरस आणि दूध एकत्र करून कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावावे आणि हलक्या हाताने मसाज करावा. टॅन निघून जातो.
गुलाबपाणी
– टॅनिग काढण्यासाठी गुलाबपाणीही तितकंच फायदेशीर ठरतं. दिवसातून किमान दोन वेळा गुलाबपाणी चेहऱ्यावर लावल्यास आठवड्याभरात लगेच फरक जाणवू लागतो.
– मुरमांमुळे चेहऱ्यावर आलेले डागही कमी करण्यासाठी तुम्ही गुलाबपाण्याचा वापर करू शकता.
(कोणताही घरगुती उपाय करताना तुमच्या फॅमेली डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. )