ताप आला किंवा जरा कसकस वाटली, की पॅरासिटॉमॉलच्या गोळय़ा सर्रास आपण घेतो, पण ज्या स्त्रिया गर्भवती असताना या गोळय़ा घेतात त्यांना होणाऱ्या मुलांमध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी असते व ते अतिक्रियाशीलतेचे शिकार बनतात, असे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे. अ‍ॅसेटामिनोफेन (पॅरासिटॉमॉल) हे औषध वेदनाशामक व तापावर गर्भारपणातही वापरले जाते, पण ते वापरताना खूप काळजी घ्यायला हवी असा या संशोधनाचा अर्थ आहे.
अलीकडच्या काही अभ्यासानुसार असे दिसून आले, की पॅरासिटॉमॉलने लैंगिकता व संप्रेरके यावरही परिणाम होतो. परिणामी, मेंदूविकासावर परिणाम होतो, त्यामुळे वागणुकीतही वाईट परिणाम दिसून येतो. लॉसएंजल्स येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील झेयन ल्यू व सहकाऱ्यांनी १९९७-२००२ दरम्यान डॅनिश राष्ट्रीय जन्म आकडेवारीचा अभ्यास केला. त्यात ६४३२२ मुले व मातांचा समावेश होता. त्यात आईवडिलांना प्रश्नावली देण्यात आली होती. त्यात त्यांनी असे म्हटले आहे, की मुलांमध्ये लक्ष केंद्रित करण्यात कमतरता भासते व ते अतिचंचल किंवा अतिक्रियाशील बनतात. यातील निम्म्याहून अधिक मातांनी अ‍ॅसेटॅमिनोफेन म्हणजे पॅरासिटॉमॉल घेतले होते. गर्भारपणाच्या प्रत्येक तिमाहीत त्यांनी अ‍ॅसेटॅमिनोफेनचा वापर वाढवला होता. पॅरासिटॉमॉलमुळे अटेन्शन डेफिसिट-हायपरअ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर व हायपरकायनेटिक डिसऑर्डर यांसारखे रोग मुलांना जडतात. त्यांच्या वर्तनात बराच फरक दिसून येतो. पॅरासिटॉमॉलचा वापर फार सहजगत्या केला जात असल्याने शरीरात त्याची मात्राही जास्त प्रमाणात जात असते, त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वाचे आहे, परंतु त्याबाबत आणखी माहिती घेऊन निष्कर्षांप्रत येण्याची गरज आहे असे वैज्ञानिकांचे मत आहे. ‘जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन पेडियाट्रिक्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा