एक आपत्कालीन स्थिती:- अर्धागवायू, पक्षाघात, लकवा, पॅरालिसीस आणि स्ट्रोक ही एकाच आजाराची वेगवेगळी नावे आहेत. आपल्या देशात दर मिनिटाला सहा लोकांना अर्धागवायूचा कोणाला ना कोणाला झटका बसतो. प्रत्येक वर्षी पंधरा लाख लोक या आजाराने ग्रासतात, तर दर तीन मिनिटाला एक जण या आजाराने दगावतो. लक्षणे ओळखून लगेच या रुग्णाला रुग्णालयात नेणे आवश्यक आहे.
६५ वर्षांचे सदाशिवराव दुपारचं जेवण आटोपून गप्पा करत बसले होते. अचानक त्यांच्या बोलण्यामध्ये फरक जाणवायला लागला. उजव्या हाताला आणि पायाला कमजोरी आली. घरच्यांनी त्यांचा भाचा डॉ. नंदू याला फोन करून त्रास सांगितला. डॉक्टरच्या लक्षात आले की, त्यांना अर्धागवायू म्हणजेच पक्षाघाताचा झटका आला आहे. त्यांनी ताबडतोब दवाखान्यात दाखल करण्यास सांगितले. सदाशिवरावांच्या मेंदूचा सीटी स्कॅन आणि रक्ताची तपासणी करण्यात आली.
डॉक्टरांनी रुग्णाच्या मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ अडकली आणि मेंदूच्या काही भागाला रक्तप्रवाह बंद झाल्याचे सांगितले. लगेच रुग्णाला डॉक्टरांनी टीपीए (टिश्यू प्लासमिनोजेन अॅक्टीव्हेटर) हे औषध सलाइनसोबत दिले. काही वेळाने रुग्णाच्या बोलण्यात सुधार झाला. उजव्या हाता-पायांमध्ये आलेली कमजोरी दूर झाली. सदाशिवरावांना वेळीच योग्य औषधोपचार मिळाला म्हणून ते झटपट बरे झाले.
आपल्या देशात दर मिनिटाला सहा लोकांना अर्धागवायूचा कोणाला ना कोणाला झटका बसतो. प्रत्येक वर्षी पंधरा लाख लोक या आजाराने ग्रासतात, तर दर तीन मिनिटांना एक जण या आजाराने दगावतो. लक्षणे ओळखून लगेच या रुग्णाला रुग्णालयात नेणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी सल्ला दिल्यास टीपीए हे औषध झटका आल्यापासून साडेचार तासांपर्यंतच देता येते. त्यानंतर त्याचा उपयोग होत नाही. किंवा नुकसान होऊ शकते. एका अभ्यासानुसार अर्धागवायूच्या शंभर पैकी एकच व्यक्ती वेळेच्या आत रुग्णालयात पोहचतो.
आणखी वाचा : निद्रानाश…शांत झोप लागण्यासाठी हे उपाय करून पाहाच
अर्धागवायू, पक्षाघात, लकवा, पॅरालिसीस आणि स्ट्रोक ही एकाच आजाराची वेगवेगळी नावे आहेत. त्याचे मुख्य दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ अडकते. ही गाठ हृदय किंवा मोठय़ा रक्तवाहिन्यांमध्ये तयार होऊन मेंदूमध्ये जाते किंवा मेंदूच्याच रक्तवाहिन्यांमध्ये तयार होते. दुसऱ्या प्रकारात मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. यालाच ब्रेन हॅमरेज असे म्हणतात. ब्रेन हॅमरेजच्या एका प्रकारात रक्तवाहिनीला फुगा (अॅन्युरीजम) येऊन तो फुटतो आणि मेंदूच्या आजूबाजूला रक्त जमा होते. या प्रकारात काही वेळातच रुग्ण दगावू शकतो. म्हणून हा प्रकार हृदयविकारापेक्षाजास्त गंभीर आहे.
समज-गैरसमज
अर्धागवायूची लक्षणे दिसल्यावरही बरेच रुग्ण थंडी वाढल्याने किंवा रक्तदाब वाढल्यामुळे हा त्रास वाटत असल्याचा समज करत उपचाराकडे दुर्लक्ष करतात. त्रास वाढून अर्धागवायूचा मोठा अॅटॅक येऊ शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान करणे, मद्यपान करणे, हृदयरोग, स्थूलपणा, रक्तामध्ये कोलोस्ट्रोल वाढणे ही अर्धागवायू होण्याची मुख्य कारणे असू शकतात. आजही बरेच लोक अज्ञानामुळे अर्धागवायूसाठी गावठी उपचाराकडे वळतात. जे अतिशय घातक आहे.
घ्यायची काळजी-
वयाची चाळिशी उलटल्यावर प्रत्येक व्यक्तीने डॉक्टरांकडे नियमित वैद्यकीय तपासणी करायला हवी. मधुमेह, उच्च रक्तदाब आढळल्यास नियमित औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्याची गरज आहे. अनेक रुग्ण औषधांची सवय लागेल या गैरसमजुतीमुळे औषध घेण्यास टाळतात. हे चुकीचे आहे. तर रुग्णांनी मद्यपान, धूम्रपानासह इतरही चुकीच्या सवयींपासून दूर राहावे. नियमित व्यायाम करण्यासह पोषक आहार घ्यावा. रक्ताच्या गाठी तयार होऊ नये, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त पातळ करण्याची औषधे नियमित घ्यावी, जेणेकरून अर्धागवायूसारखा घातक आजार टाळता येऊ शकतो. कुणाला अर्धागवायू झाल्यास तो आजार रुग्णापर्यंत सीमित न राहता, कुटुंबाचा आजार बनतो. म्हणून अर्धागवायू होऊ नये म्हणून आधीच काळजी घेण्याची गरज आहे.
आजाराची लक्षणे
- अचानकपणे आवाजात बदल
- शरीराच्या एका बाजूला कमजोरी
- हाता-पायाला मुंग्या येणे
- चेहरा वाकडा होणे
- भोवळ येणे
- चालताना तोल जाणे
- नजर कमी होणे
- एका वस्तूच्या दोन-तीन प्रतिमा दिसणे
- बेशुद्ध अवस्था येणे
रुग्णांसाठी आवश्यक
एकदा अर्धागवायू झाल्यावर पुन्हा ते होऊ नये, याकरिता प्रत्येक रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत. या आजाराचा अॅटॅक आल्यावर उपचारात सुरुवातीचे काही तास आणि दिवस अतिशय महत्त्वाचे असतात. या काळात मेंदूच्या त्या भागाला कायमस्वरूपी इजा होऊ नये म्हणून वेगवेगळे उपाय केले जातात. औषधोपचारासोबत फिजीओथेरपी (व्यायाम) करणे तितकेच आवश्यक असते.
–डॉ. चंद्रशेखर मेश्राम (मेंदूरोगतज्ज्ञ)