आजकाल कामानिमित्त आई आणि वडील दोघांनाही कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे घरातील लहान मुलं घरात एकटीच असतात. अशावेळी पालकांना त्यांची सतत चिंता सतावत असते. लहान मुलं कधी काय करतील हे सांगता येत नाही. घरात असणारा गॅस, वीजबोर्ड यांची लहान मुलांना जास्त माहिती नसते आणि त्यांच्या वयात ते समजवून सांगणे ही कठीण असते. त्यामुळे या वस्तुंमुळे लहान मुलांना इजा तर होणार नाही ना अशी काळजी पालकांना सतावत असते. यावर उपाय म्हणजे घराबाहेर पडण्याआधी पालकांनी काही गोष्टींची काळजी घेतल्यास, लहान मुलांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या.
घराबाहेर पडताना या गोष्टींची काळजी घ्या
इलेक्ट्रिक बोर्डवर चिकटपट्टी लावा
लहान मुलांना अनेकवेळा इलेक्ट्रिक बोर्डला हात लावण्याची सवय असते, अशामध्ये त्यांना विजेचा धक्का लागू शकतो. यासाठी खबरदारी म्हणून घराबाहेर पडण्याआधी इलेक्ट्रिक बोर्डवर चिकटपट्टी लावा.
स्वयंपाकघरामधील सुरक्षितता
किचनमध्ये गॅसमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी घराबाहेर पडताना आठवणीने गॅस बंद करा. तसेच स्वयंपाकघरातील लाईट्स बंद करून तिथे जाऊ नका असे मुलांना सांगा.
कैची, सूरी अशा वस्तु लपवून ठेवा
कैची, सूरी, सुई, चाकू अशा हानिकारक वस्तू मुलांना घरात एकटं ठेवण्यापुर्वी लपवून ठेवा.
मुलांचा आत्मविश्वास वाढवा
कामानिमित्त घराबाहेर पडताना किंवा इतर वेळी मुलांना सोबत घेऊन जाणे शक्य नसते, त्यामुळे त्यांना घरी एकट्याने राहण्याची सवय व्हावी यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवा. त्यांना प्रत्येक गोष्ट नीट समजवून सांगा, यामुळे त्यांना काय करावे आणि काय करू नये याची जास्तीत जास्त माहिती मिळेल.