स्मार्टफोन हा लहान मुलांच्या मेंदुच्या विकासासाठी घातक असल्याचे तज्ज्ञांनी केलेल्या पहाणीत आढळून आले आहे. स्मार्टफोन्सवर खेळल्याने मुलांमधील मेंदूच्या विकासामध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे लहान मुलांना स्मार्टफोन्सपासून दूर ठेवण्याचा सल्ला ही त्यांनी दिला आहे.
सीबीएस न्यूजने अलिकडेच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, अनेक पालक वेळ घालवण्याचे साधन म्हणून त्यांचे स्मार्टफोन लहान मुलांना खेळायला देतात. यातून काही शिकण्याऐवजी मुले विचलित होतात. याचा परिणाम त्यांच्या विकासावर होत असून तज्ज्ञांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. बालपणाचा काळ हा मुलांच्या मेंदुच्या विकासाचा काळ असतो, परंतू त्यांनी जास्त वेळ स्मार्टफोनवर घालवल्यास वकृत्व, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या मुलभूत कौशल्यांमध्ये त्यांना अडथळ्यांना सामोरे जावे लागेल.
मानसोपचार तज्ज्ञ गेल साल्टझ् म्हणाल्या की, मुलांचा सांभाळ करताना केवळ ती कंटाळू नये म्हणून त्यांच्या हाती स्मार्टफोन्स दिले जातात. पण, प्रत्यक्षात तांत्रिक उपकरणे त्यांसाठी हानीकारक ठरत आहेत. बालपण हे खेळण्याबागडण्यासाठी असून याचवेळी त्यांना विकासकार्याची गरज असते. मुलांना मोबाईलवरील खेळांपेक्षा त्यांमध्ये कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढवतील अशा कल्पक खेळांची गरज असते.
धकाधकीच्या जीवनात पालक मुलांना अनेक प्रकारचे गेम्स आणून देतात पण सर्वच गेम हे त्यांच्यासाठी चांगले असतील असे नाही. त्यातून स्मार्टफोनसारखी वस्तू तर मुलांसाठी अतिघातक ठरणारी आहे. मुलांना तांत्रिक उपकरणांची नाही तर पालकांनी वेळ देण्याची गरज असते. बालपणात संस्कार आणि अंतर्गत विकासात जी मदत पालक करु शकतात ते कोणतेही तांत्रिक उपकरण नाही करु शकत. त्यामुळे पालकांनो! मुलांना स्मार्टफोन्स देणे टाळा.

Story img Loader