टाईप २ मधुमेहाची औषधे वापरल्यामुळे पार्किन्सन आजाराची होणारी वाढ रोखण्यास मदत होत असल्याचे संशोधकांना प्रथमच आढळून आले आहे.

पार्किन्सन आजारामध्ये मेंदूचे उत्तरोत्तर नुकसान होत जाते. त्यामुळे पेशीकडून डोपामाइन हार्मोनची निर्मिती होत नाही. परिणामी हालचाल करण्यास आणि अखेरीस स्मृती समस्या निर्माण होतात. थेरपीमुळे डोपामाइनची लक्षणे ओळखून त्याची पातळी ओळखता येते. त्यावर काही प्रमाणात उपचार करणे शक्य असते. मात्र यामध्ये मेंदूमधील पेशी मरणे थांबवता येत नाही.

वैद्यकीय चाचणीमध्ये ६२ रुग्णांवर चाचणी करण्यात आली. यामध्ये मधुमेहाची औषधे देऊन पार्किन्सनची होणारी वाढ थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पार्किन्सन आजारामध्ये या आजाराची वाढ थांबवणे आवश्यक असते. मधुमेहाची औषधे त्यावर काही प्रमाणात परिणाम घडवून आणतात, असे ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील टॉम फोल्टनी यांनी म्हटले आहे.

असे असले तरी याबाबत अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. त्यामुळे औषधे वापरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. चाचणीमध्ये निम्म्या रुग्णांना मधुमेहाचे औषध देण्यात आले आणि इतर निम्म्या रुग्णांना प्लसीबो देण्यात आले. यामध्ये ज्या रुग्णांना मधुमेहाचे औषध देण्यात आले होते, त्यांच्यामध्ये पार्किन्सनची होणारी वाढ काही प्रमाणात रोखण्यात यश आले, असे संशोधकांनी सांगितले.

 

Story img Loader