खेळांमधील नियमित सहभागामुळे शारीरिक संपन्नता तर लाभतेच शिवाय निर्णयक्षमता, खिलाडूवृत्ती हे गुण वाढीस लागून व्यक्तिमत्त्वही संपन्न बनते, असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय महाप्रबंधक अजित गोखले यांनी केले.
आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंसाठी आडगाव येथील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित सराव शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. संदीप गुंडरे, हेमंत पाटील, शिबीर समन्वयक प्रा. जावेद मणियार आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी केले. महाविद्यालयात क्रीडा प्रोत्साहनार्थ राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. उद्याचा सुजाण नागरिक घडवायचा असल्यास आज व्यायाम आणि खेळाला पुरेसा वेळ दिलाच पाहिजे, असा सल्ला डॉ. गुंडरे यांनी दिला.
सराव शिबिरात महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे दीडशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.  हे खेळाडू कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल बास्केटबॉल, अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील. सूत्रसंचालन डॉ. सुनील औंधकर यांनी केले. प्रा. दीपक दळवी यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा