एसएमएस, चॅटिंग करताना जर पलीकडची व्यक्ती तुम्हाला उत्तर द्यायला उशीर लावत असेल, तर ती तुमच्याशी खोटे बोलत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पलीकडच्या व्यक्तीकडून तुमच्या संवादाला प्रतिसाद देताना उशीर होत असेल, तर तो जाणीवपूर्वक असू शकतो आणि ती व्यक्ती खरी माहिती लपवण्याच्या नादात उत्तर द्यायला उशीर लावू शकते, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले.
बर्मिंगहॅम यंग विद्यापीठाने केलेल्या पाहणीतून असे आढळून आले की ज्यावेळी व्यक्ती खोटं बोलत असते, त्यावेळी ती एसएमएसला किंवा चॅटिंगमध्ये उत्तर द्यायला उशीर लावते. अशा व्यक्तीचे उत्तरही खूप त्रोटक असते आणि त्यामध्ये खूप दुरुस्त्या केलेल्या असतात. या विद्यापीठातील प्राध्यापक टॉम मेझर्वी यांच्या नेतृत्त्वाखाली हे संशोधन करण्यात आले.
इंटरनेटच्या युगात परस्परांशी संवाद साधताना फसवणूक केली जाण्याची शक्यता अधिक असते. अनेकवेळा लोकं स्वतःची ओळख लपवून दुसऱयाशी संवाद साधत असतात. डिजिटल युगात समोरची व्यक्ती खोटं बोलत आहे, हे ओळखण्यासाठी काही उपाय आहेत का, याचा शोध घेण्यासाठीच आम्ही हे संशोधन केले, असे मेझर्वी यांनी सांगितले.
मेझर्वी आणि त्यांचा सहकारी जेफ्री जेकिन्स यांनी एक संगणकाधारित कार्यक्रम तयार केला. यामध्ये सहभागी होणाऱयांना वेगवेगळे ३० प्रश्न विचारण्यात येणार होते. अमेरिकेतील दोन मोठ्या विद्यापीठातील २०० विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले. यामध्ये जवळपास निम्म्या प्रश्नांची विद्यार्थ्यांनी चुकीची उत्तर दिली. ही उत्तरे देण्यासाठी विद्यार्थ्यांनी इतर प्रश्नांच्या उत्तरांपेक्षा १० टक्के जास्त वेळ घेतला. त्याचबरोबर ही उत्तरे दाखल करण्याअगोदर खूप वेळा दुरुस्त करण्यात आल्याचे संशोधकांना आढळून आले. त्याआधारे त्यांनी हा निष्कर्ष काढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा