How To Stop Over Eating: मला वजन कमी करायचंय ही जवळपास प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीची इच्छा असते. जागतिक आरोग्य संस्थेच्या अलीकडील अहवालानुसार सद्य घडीला जगभरात २५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या अतिवजनाने त्रस्त आहे. वजन कमी करायचं तर तोंडावर ताबा ठेवणे हे अत्यंत आवश्यक व न टाळता येणारे आहे. पण काही वेळा कितीही प्रयत्न केला तर मोजकं खाऊन पोटच भरत नाही. आता अशावेळी पोटाची उपासमार करूनही शरीराला त्रासच होऊ शकतो. तुम्हालाही जर का वारंवार लागणारी भूक टाळायची असेल तर त्यासाठी आज आपण सर्वात सोपे असे काही मार्ग पाहणार आहोत. यामुळे तुम्हाला डाएट फॉलो करायला सुद्धा नक्कीच मदत होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सतत भूक लागत असल्यास करून पाहा ‘हे’ उपाय (How To Stop Binge Eating)

(१) आपल्याला भूक नियंत्रणात आणायची आहे मारून संपवायची नाही. त्यामुळे आहारात फळे, भाज्या, शेंगा, नट, बिया आणि संपूर्ण धान्य अधिक समाविष्ट करा. या सर्व पदार्थांमध्ये फायबरसहित पोषण सत्व अधिक असतात परिणामी तुमच्या शरीराला त्याच्या प्रक्रियेसाठी अधिक वेळ लागतो व भूक लागण्याची प्रक्रिया लांबते.

(२) प्रत्येक दिवसाची सुरुवात निरोगी ब्रेकफास्टनेच करा यामुळे दिवसभरात जास्त प्रमाणात खाण्याचा धोका कमी होऊ शकतो. जेवण वगळणे टाळा कारण जास्त भूक लागली तर आपण जास्त खातो, याउलट थोडी भूक लागल्यावर खाल्ल्यास पोट भरल्यासारखे वाटते व मनही तृप्त होते. आपण जे अन्न ग्रहण करत आहात त्याप्रती कृतज्ञता बाळगा.

(३) पुरेसे पाणी घ्या, दिवसभर हायड्रेटेड राहणे आणि पुरेसे पाणी पिणे हा भूक नियंत्रणात ठेवण्याचा एक सोपा मार्ग आहे.

(४) तुमच्या जेवणाची वेळ निवडा, सकाळी जेवल्याने वजन कमी होते की रात्री या वादात अडकूच नका. तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक वेळ निवडा पण त्याला चिकटून राहा. दिवसाच्या ठराविक वेळी दोन किंवा तीन स्नॅक ब्रेकसह तीन मील घेण्याचे वेळापत्रक ठेवा. जेवणात जास्त अंतर ठेवू नका.

(५) आपल्याला घरात जंक फूड किंवा खाद्यपदार्थ एकदाच महिनाभरासाठी भरून ठेवण्याची सवय असते. असे करणे टाळा. कारण आपल्या हाताशी खाणं आहे हे माहित असताना नियंत्रण ठेवणे हे सुरुवातीच्या दिवसांमध्ये अत्यंत कठीण ठरू शकते.

(६) जरी तुम्ही पिझ्झा आणि पास्तासारखे फास्ट फूड खात असाल, तरी खूप सावधगिरी बाळगा आणि हळूहळू खा. तुमचे शरीर स्वतः तुम्हाला सांगेल की तुम्ही आता या खाण्याचा आनंद घेतला आहे आणि आता थांबण्याची वेळ आली आहे.

(७) एखादा पदार्थ बघूनच तुम्हाला तो खावासावाटत असेल, याचा अर्थ तुम्हाला पदार्थ आवडत आहे. जेव्हा भूक लागते तेव्हाच खा. मनाची आणि पोटाची भूक यातील फरक ओळखा.

(८) तुमच्या मनाला योगाने प्रशिक्षित करा, तुमच्या शरीराचे ऐका. योगासने केल्यास तुम्ही मनाला इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यास प्रशिक्षित करू शकता. यामुळे तुम्हाला अधिक खाण्याची भीती न बाळगता बिनधास्त जेवणाचा आनंद घेता येईल.

(९) आनंद झाला की खायचं, दुःख असताना, रागात जेवायचं या तिन्ही सवयी टाळा. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार खायचं आहे हे मनाला समजवून सांगा.

१०) जेवल्यावर लगेच बसून/ झोपून राहू नका. थोडेसे फिरायला जा, गाणी गा, डान्स करा, जेवणापूर्वी व जेवणाच्या नंतर तुमचा मूड खराब नसेल याची खात्री करा.

हे ही वाचा<< खाऊन पिऊन वजन कमी करते TLC डाएट? जगभरातील तज्ज्ञांनी बनवलेला Diet Plan नीट पाहून घ्या

लक्षात घ्या, आपल्याला जेवताना अनेकदा आग्रह केला जातो पण अशाने आपण विनाकारण शरीराची भूक वाढवत असतो. जर ही सवय कायम राहिली तर शरीराची बायोकेमिस्ट्री खराब होण्याचा धोका असतो. इतकेच नाही तर अन्न शोषून घेण्याची, पोषण सत्व रक्तात मिसळण्याची व विषारी द्रव्ये काढून टाकण्याची क्षमताही बिघडण्याची शक्यता असते. म्हणूनच केवळ वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी सुद्धा प्रमाणात खाणे महत्त्वाचे असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Perfect 10 step plan to reduce over eating acidity weight loss best way to loose weight know from health expert svs
Show comments