Water Intake As per Weight & Age: आपले शरीर हे ६५ ते ७० टक्के पाण्याने भरलेले आहे. शरीरातील प्रत्येक अवयवाला कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. आपल्या शरीरातील अवयवांची अंतर्गत कार्यप्रणाली व्यवस्थित चालू राहण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे असते. त्वचा, पोट, किडनी, केस अगदी नखशिखांत प्रत्येक अवयवासाठी पाणी हे अमृतच आहे पण म्हणतात ना कुठल्याही गोष्टीत अति केल्यास माती होतेच. अलीकडेच प्रमाणापेक्षा जात पाणी प्यायल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. अमेरिकेतील इंडियानामध्ये दोन मुलांची आई असलेल्या ३५ वर्षीय महिलेने २० मिनिटांत दोन लिटर पाणी पिण्याची चूक केली. याच चुकीमुळे सदर महिलेला आपले प्राण गमवावे लागले. याच पार्श्वभूमीवर आपण नेमकी आपल्या शरीराची गरज समजून घेणार आहोत.
आजच्या लेखात आपण वयानुसार व वजनानुसार तुम्ही दिवसाला किती पाणी प्यायला हवे हे जाणून घेणार आहोत. यासाठी खालील सोपा तक्ता व सूत्र जाणून घ्या…
वयानुसार सरासरी किती पाणी प्यावे?
वय | पाणी |
७-१२ महिन्यांचे बाळ | साधारण (०.८ लिटर) |
१ ते ३ वर्षांचे बाळ | १.३ लिटर |
४ ते ८ वर्षे | १.७ लिटर |
९ ते १३ वर्षे मुलं/ मुली | २.४ लिटर/ २. १ लिटर (अनुक्रमे) |
१४ ते १८ वर्षे मुलं/ मुली | ३.१ लिटर/ २. ५ लिटर (अनुक्रमे) |
१८ वर्षे पुढील पुरुष | ३. ५ लिटर |
१८ वर्षे पुढील महिला | २. ७ लिटर |
हे ही वाचा<< झोपून उठताच सकाळी एक ग्लास हळदीचे कोमट पाणी का प्यावे? ‘या’ १० त्रासांवर झटपट उत्तर मिळवा
वजनानुसार सरासरी किती पाणी प्यावे?
तुमच्या वजनाला (किलोनुसार) ३० ने भागायचे. म्हणजेच, या सूत्रानुसार, आपल्याला समजेल की, शरीराच्या वजनानुसार आपण दररोज किती लिटर पाणी प्यावं. समजा तुमचे वजन ६० किलो असेल तर ते ३० ने भागाकार केल्यास २ ही संख्या मिळेल. म्हणजेच, ६० किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज निदान २ लिटर पाणी प्यावं. जर वजन ५० किलो असेल तर १.६ लिटर (१ लिटर आणि ६०० मिली) पाणी प्या.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहिती व सामान्य ज्ञानावर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला सुद्धा आवर्जून घ्या)