How To Store Mangoes: आंब्याचा सीजन सुरु झालाय, तुम्हीही आंब्यांची पेटी नक्की कोणाकडून खरेदी करायची, किती रुपये डझनने व्यवहार करायचा, या सगळ्या विचारात असाल. एक दोन डझन आंबे घेण्यापेक्षा जर पेटीभर आंबे घेतले तर थोडे स्वस्त पडू शकतात. पण खरेदी केलेले हेच आंबे नीट न ठेवल्यास वाचवलेले पैसेच तुमचं नुकसान घडवून आणू शकतात. अगदी डझनभर आंबे सुद्धा आपण एकाच दिवसात खाऊन संपवत नाही पण मग हे उरलेले आंबे नक्की कसे स्टोअर करायचे? आज आपण याच प्रश्नावर उपाय पाहणार आहोत.
आंबे फ्रीजमध्ये ठेवावे की बाहेर?
तुमचे आंबे पुरेसे पिकलेले नाहीत असे आढळल्यास, १८-२२ डिग्री सेल्सिअस तापमानात फळ पिकेपर्यंत ठेवावे. आंबा रेफ्रिजरेटरमध्ये पिकणार नाही त्यामुळे बाहेरच किंचित काळोखात व शक्य असल्यास कागदी पिशवीत आंबे साठवून ठेवावे. काहीजण हिरवे व कच्चे आंबे पिकण्यासाठी तांदळात सुद्धा ठेवतात.
पूर्ण पिकलेले आंबे काही दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येतात पण प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पूर्ण आंबा कधीही ठेवू नका.
पिकलेला आंबा कसा टिकवावा?
आंबा पिकल्यानंतर खराब होण्याचा धोका टाळण्यासाठी तुम्ही आंब्याचे चौकोनी तुकडे करून झिपलॉक बॅगमध्ये ठेवू शकता. तुमच्या उरलेल्या आंब्यांसह झिपलॉक पिशव्या पॅक करा आणि सील करा. पिशव्या सील करण्यापूर्वी शक्य तितकी हवा बाहेर काढा. या झिपलॉक बॅग आपल्याला फ्रीजर मध्ये ठेवायच्या आहेत कारण खालच्या कप्प्यात आंबे ठेवल्यास तापमान कमी असल्याने आंबे खराब होऊ शकतात.
हे ही वाचा<< तुमच्या शरीराला दिवसात किती पाणी गरजेचे आहे? स्वतः डॉक्टर सांगतायत, डिहायड्रेशनमुळे दिसणारी ‘ही’ लक्षणे
आंबा सडल्याची चिन्हे कशी ओळखावी?
साधारण, सहा दिवसांनंतर, पिकलेला आंबा कुजण्याचा धोका असतो. ही प्रक्रिया सुरु होताना आंब्याची काळी त्वचा आणि आंबट वास यांसारखी चिन्हे दिसण्याची शक्यता असते. जर आंब्याच्या आतील भाग नरम झाला असेल तर आंब्यांच्या त्वचेवर थोडेसे डाग पडतात. याशिवाय आंबा कापल्यावर आतील भागात पांढरा रंग दिसू शकतो.