Holi festival planning 2024 : रंगोत्सव, रंगांचा सण, फेस्टिव्हल ऑफ कलर्स, असे होळी या सणाला विविध नावांनी ओळखले जाते. या सणाला जशी विविध नावे आहेत, तशीच देशभरात होळी खेळण्याच्या पद्धतींतही आपल्याला विविधता दिसून येते. मात्र, या सर्व पद्धतींमधून ‘वाईटावर सदैव चांगल्याचा विजय होतो’ हा एक संदेश दिला जातो. यंदाची होळी ही वीकएण्डला जोडून म्हणजे शनिवार व रविवार यांना लागून आली आहे. त्यामुळे तुमचा या सणाच्या निमित्ताने कुठे बाहेर फिरायला जायचा किंवा खास होळी खेळण्यासाठी कुठे जायचा बेत असेल, तर तुम्ही भारतातील कोणत्या ठिकाणांना भेट देऊ शकता ते पाहा.
होळी खेळायचे म्हटले की, आपण रंग, पाण्याच्या पिचकाऱ्या, रंगीत पाण्याने भरलेले फुगे हे आलेच. त्याचबरोबर डीजेच्या तालावर नाचगाणे होते. मात्र, भारताच्या काही राज्यांमध्ये सांस्कृतिक वारसा जपत, कलागुणांना वाव देत होळी हा सण साजरा केला जातो. त्यामुळे यंदा तुम्हाला हा सण थोड्या हटक्या पद्धतीने साजरा करायचा असल्यास भारतातील या पाच ठिकाणांना अवश्य भेट द्या.
वेगळ्या पद्धतीने होळी साजरी करणारी भारतातील पाच ठिकाणे पाहा :
१. उत्तर प्रदेश – मथुरा
मथुरा येथील बरसानामध्ये ‘लाठमार होळी’ हा प्रकार प्रसिद्ध आहे. या होळीमध्ये तेथील रहिवासी श्रीकृष्णाच्या काळातील गोप आणि गोपिकांप्रमाणे वेशभूषा करतात. तसेच गोपिका श्रीकृष्णासारख्या वेशभूषा केलेल्या आणि कृष्णासारख्या मजा-मस्करी करणाऱ्या पुरुषांना लाठ्या मारून पळवून लावून नंतर रंग खेळतात.
२. उत्तर प्रदेश – वृंदावन
वृंदावनमध्ये ‘फूलवाल्यांची होळी’ हा प्रकार प्रसिद्ध आहे. त्यामध्ये वसंत ऋतूंमधील फुले आणि रंग उधळून होळी खेळली जाते. ही पद्धत वृंदावनातील ‘बांके बिहारी’ मंदिरात सर्वाधिक प्रसिद्ध आहे. एकंदरीतच विविध स्थानिक लोककथा आणि दंतकथांवरून ही फूलवाल्यांची होळी साधारण आठवडाभर खेळली जाते.
३. पश्चिम बंगाल – शांतिनिकेतन
शांतिनिकेतनमध्ये हा सण प्रचंड उत्साहाने साजरा केला जातो. इथे याला बसंता उत्सव, असेही म्हणतात; ज्याचा संबंध रवींद्रनाथ टागोर यांच्याशी आहे. तुम्ही होळीनिमित्त या ठिकाणाला भेट देणार असल्यास, खास सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, कविता यांचा आनंद घेऊ शकता.
हेही वाचा : Car tips : ‘बुरा ना मानो होली है!’ पण गाडीवर रंग उडाला तर? होळीआधी पाहा ‘या’ टिप्स
४. पंजाब – आनंदपूर साहिब
पंजाबमधील या भागात ‘होला मोहल्ला’ होळी साजरी केली जाते. तसेच या उत्सवादरम्यान मार्शल आर्ट्सचे प्रात्यक्षिक, तसेच प्रायोगिक सामन्यांचे सादरीकरण केले जाते.
५. उदयपूर – राजस्थान
सिटी पॅलेसमध्ये उदयपूरचे राजघराणे होळीची सर्व तयारी आणि आयोजन करून समारंभात सहभागी होते. शहरामध्ये सर्व ठिकाणी आयोजित केलेल्या विविध पार्ट्या, कार्यक्रम व उत्सवांपैकी एक आहे, अशी सर्व माहिती एनडीटीव्हीच्या एका लेखावरून मिळते.