सध्या लहान मुलांसह मोठी माणसे व्हिडिओ गेम खेळताना दिसतात. सध्या तेच करमणुकीचे साधन झाले आहे. खूप ताणतणाव आल्यावर थोडा वेळ व्हिडीओ गेम खेळला तर आरामदायी वाटू शकते. काही विशिष्ट व्हिडिओ गेमचा उपयोग लहान मुलांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी, त्यांना काही शिकवण्यासाठी केला जातो. स्नायूंच्या किंवा मेंदूच्या आजारांमध्ये उपचारासाठी काही व्हिडीओ गेम बनवलेले आहेत. अशा व्हिडिओ गेमचे आरोग्यासाठी काही फायदेही आहेत आणि काही तोटेही.
व्हिडिओ गेम कोण वापरते?
व्हिडिओ गेम सर्वाना सुलभरीत्या मिळू शकतात, पण सर्वाना त्याचे व्यसन होते असे नाही. काही व्यक्तींना व्हिडीओ गेम खेळल्यावर थोडय़ा वेळाने कंटाळा आणि थकवा येतो. ‘व्हिडिओ गेम’ऐवजी मैदानी खेळ आणि इतर मुलांशी सामूहिकपणे खेळायला मुलांना जास्त आवडते. मात्र जी मुले लहानपणापासूनच व्हिडिओ गेम खेळतात किंवा ज्या मुलांना घराबाहेर खेळण्याच्या सुविधा किंवा सहवास मिळत नाही, ते व्हिडिओ गेमकडे वळतात. मुलांमधील चंचलपणा म्हणजेच हायपर अॅक्टिव्हिटी डिसऑडर असलेल्या मुलांना व्हिडिओ गेमकडे जास्त आकर्षण वाटते आणि त्यांना त्याची सवय लवकर लागते. एकलकोंडी, घाबरट आणि संशयखोर व्यक्तींनाही व्हिडिओ गेमचे जास्त आकर्षण असते.
व्हिडिओ गेम आणि आरोग्य
व्हिडिओ गेमचे परिणाम त्याच्या प्रकारावर आणि किती खेळत आहे त्या प्रमाणावर अवलंबून असतात. चमकणारे, सतत आणि पटकन हलणारे चित्र, आक्रमक असे व्हिडिओ गेम वापरल्याने मुलांमध्ये एकाग्रता कमी होणे, त्यांच्यातील आक्रमकता वाढणे आणि फीटचे झटके येणे असे दुष्परिणाम होतात. एकटे सतत व्हिडिओ गेम खेळत राहिल्यामुळे, इतरांशी कसे वागावे हे शिकू शकत नाहीत आणि ती एकटी पडून जातात. सतत व्हिडीओ गेम खेळणाऱ्या मुलांमध्ये एकाग्रता कमी, शारीरिक स्थूलपणा, स्मृतीचा कमीपणा, अमली पदार्थाकडे आकर्षण आणि अभ्यासामध्ये मागे पडणे असे आढळलेले आहे. प्रौढांमध्ये व्हिडीओ गेम सतत खेळण्याने थकवा, चिडचिडेपणा, डोकेदुखी असे प्रकार होतात. त्याशिवाय बोटांचे, खांद्यांचे, पाठीचे सांधे आणि मांसपेशीचे दुखणे सुरू होते. मनगट, कोपरा आणि गुडघ्याजवळचा स्नायू यांचे नुकसान होऊ शकते. संध्याकाळी उशिरापर्यंत व्हिडिओ गेम खेळण्याने झोपेचे आजार सुरू होतात. खूप जास्त व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांमध्ये अतिनैराश्यासारखे मानसिक आजार जास्त प्रमाणात आढळतात.
व्हिडीओ गेमचा योग्य वापर
व्हिडिओ गेम नेहमी वापरले तरी चालतील, मात्र ते प्रमाणात वापरावे. दररोजचे काम, मैदानी खेळ, व्यायाम, झोप आणि सामाजिक संवाद सांभाळून उरलेल्या वेळेत व्हिडिओ गेमचा वापर करावा. व्हिडिओ गेम मुलांचे वय आणि समज पाहून निवडले पाहिजेत. गेम खेळताना आजूबाजूला योग्य प्रकाश पाहिजे. योग्य स्थितीत बसून खेळावे, डोळ्यांपासून थोडय़ा अंतरावर ठेवले पाहिजे. व्हिडिओ गेम खेळून अंग दुखणे, डोकेदुखी असे काही वाटले तर ते बंद करावे. व्हिडिओ गेमचे दुष्परिणाम होईपर्यंत खेळत राहणे चांगले लक्षण नाही. जीवनातील इतर व्यक्ती आणि कामे सोडून व्हिडिओ गेम खेळणे हे व्यसनाचे लक्षण आहे. अशा व्यक्ती दुष्परिणाम झाल्यावरही खेळत राहतात आणि त्यांचे पूर्ण जगणे व्हिडिओ गेमच्या भोवतीच असते. या व्यक्तींना व्यसनमुक्तीचा उपचार द्यावा लागतो. मुलांमध्ये हा धोका विशेष असल्यामुळे त्यांच्या व्हिडिओ गेम वापरण्याकडे पालकांनी विशेष लक्ष दिले पाहिजे.