करोनावर मात केल्यानंतर अनेकांना केस गळतीच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे कोविडनंतर केस गळती होणे हे सामान्य असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. कोविड काळात आलेल्या मानसिक तणावामुळे केस गळतीच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे वैद्यकिय तज्ज्ञांचे मत आहे.
‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना त्वचारोग तज्ज्ञ डॉ. स्तुती खरे शुक्ला यांनी “करोना झाल्यानंतर ७० ते ८० टक्के रुग्णांना केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या सामान्य आहे. अशाप्रकारच्या केस गळतीला ‘टेलोजेन इफ्लुव्हियम'(telogen effluvium) असे म्हणतात,” अशी माहिती दिली. मात्र त्याचसोबत, “हा तात्पुरते केस गळतीचा एक प्रकार आहे. केस गळायला सुरुवात झाल्यानंतर दोन ते चार महिन्यानंतर केस गळणे कमी होऊ लागते,” असेही त्यांनी सांगितले.
टेलोजेन इफ्लुव्हियम म्हणजे काय?
सध्या कोविडजन्य परिस्थितीमुळे मानसिक ताणतणावात प्रचंड वाढ झाली आहे. वाढलेला तणाव केस गळतीचं कारण ठरू शकतो. तसेच, सर्जरी, ताप यामुळेही केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. आपल्या केस वाढीच्या चक्रामध्ये वेगवेगळे टप्पे असतात आणि जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपले केस विश्रांतीच्या अवस्थेत असतात, सतत तणावामध्ये असल्यानंतर दोन – तीन महिन्यात केस गळायला सुरवात होते,”, असेही डॉ.स्तुती खरे शुक्ला यांनी सांगितले.
डॉ.स्तुती खरे शुक्ला यांनी दिलेल्या काही टिप्स
१. आहारात अंडी, चिकन, मासे, पालेभाज्या आदी प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
२. व्यायाम केल्यामुळे रक्ताभिसरणाला चालना मिळते. यामुळे शरिरात हॅपी हार्मोन तयार होतात आणि नविन केसांची निर्मिती होते.
३. मल्टी व्हिटायमीन, अमिनो ॲसिड यांचा वापर केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतो.
४. Redensyl आणि Lypsyl या लोशनचा वापर करा.
५. जास्त केस गळतीची समस्या असल्यास तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्या.