नवी दिल्ली : मुलांचे योग्य प्रकारे पोषण झाले नाही तर त्यांच्या शारीरीक विकासावर परिणाम होतो. भारतात तर समतोल आहराअभावी लाखो मुले कुपोषणाच्या विळख्यात सापडली आहेत. अशा मुलांची उंची, वजन कमी असते. तसेच त्यांची रोगप्रतिकारशक्तीही कमी असते. परंतु एका नव्या संशोधनानुसार आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबातील मुलांच्या मेंदूच्या विकासावरही विपरीत परिणाम होतो.
‘वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन’ने केलेल्या संशोधनानुसार गरिबीला तोंड दिलेली मुले मोठी झाल्यानंतर त्यांच्या मेंदूच्या संरचनेवर परिणाम होऊ शकतो.
या संशोधनानुसार मुलांच्या भोवतालचा परिसर, कुटुंबाची स्थिती आणि मेंदूतील पांढऱ्या पदार्थामध्ये परस्पर संबंध आहे. या पांढऱ्या पदार्थाच्या माहितीचे विश्लेषण करण्यात महत्त्वाची भूमिका असते. या संशोधनासाठी ९ ते दहा वर्षे वयोगटातील १२ हजार मुलांच्या मेंदूच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. या वेळी मेंदूतील पांढरा पदार्थ कमकुवत असेल तर अशा मुलांची दृष्टी कमकुवत असते. तसेच मानसिक आरोग्यासंबंधी समस्यांनाही या मुलांना तोंड द्यावे लागते.